महाराष्ट्र सरकारने दिवाळीमध्ये राज्यातील लाडक्या बहिणींना १५०० रुपयांचा सन्मान निधी देण्याचा निर्णय घेतला असून लाभार्थी महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. १ कोटी ६६ लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात येत आहे. टप्प्या टप्प्याने पुढील दोन दिवसांत सर्व महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची दुष्काळी मदत आणि महिलांना १५०० रुपये, असा लाभ सरकारकडून देण्यात येत आहे.
ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?
राज्यातील लाभार्थी महिलांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचे ३ हजार रुपये एकत्र जमा होतील, अशी आशा होती. मात्र, सरकारकडून फक्त एकाच महिन्याचा सन्मान निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी येतील, अशी चर्चा महिलांमध्ये सुरू आहे. नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला असून अद्याप ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत चर्चा समोर आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस, २५ ते २८ नोव्हेंबर या काळात ऑक्टोबर महिन्याचे १५०० रुपये खात्यात येऊ शकतात. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या फक्त सप्टेंबर महिन्याचाच हप्ता जमा होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
हप्ता खात्यावर आला की नाही, हे कसे तपासाल?
तुमच्या बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर बँकेकडून पैसे जमा झाल्यावर ‘Credited with Rs. 1500’ किंवा ‘DBT Credit’ असा मेसेज येतो का, ते मेसेज बॉक्समध्ये तपासा. तुम्ही मोबाईलवर UPI अॅप्स वापरत असाल तर PhonePe, Google Pay किंवा Paytm उघडून ‘Check Bank Balance’ किंवा ‘Balance & History’ या पर्यायावर क्लिक करून UPI PIN टाकल्यानंतर बँक बॅलन्स आणि स्टेटमेंटमध्ये १५०० रुपये जमा झाले आहेत का, ते पाहू शकता. मोबाईलमधील ‘नारी शक्ती दूत’ किंवा अधिकृत लाडकी बहीण अॅप उघडून नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉगिन केल्यानंतर ‘यापूर्वी केलेले अर्ज’ किंवा ‘Form Status’ वर जाऊन अर्जाची स्थिती (Approved) आणि हप्त्याचे पेमेंट स्टेटस तपासता येते. तुमच्या बँकेच्या टोल-फ्री नंबरवर नोंदणीकृत मोबाईलवरून मिस्ड कॉल देऊन बॅलन्सचा मेसेज मिळवता येतो, तसेच जवळच्या बँकेत जाऊन किंवा मायक्रो एटीएम / सीएससी केंद्रात जाऊन पासबुक प्रिंट करून घेता येते. योजनेचे पैसे थेट बँक खात्यात (DBT द्वारे) जमा होतात. pfms.nic.in या अधिकृत वेबसाईटवर ‘Know Your Payments’ किंवा ‘DBT Status’ वर क्लिक करून तुमची बँक निवडा, बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा आणि स्क्रीनवर दिसणारा सुरक्षा कोड टाकून सर्च केल्यास पैसे जमा झाल्याची माहिती दिसते. तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि DBT पर्याय सुरू असणे आवश्यक आहे. स्टेटस ‘Approved’ असूनही पैसे आले नसतील तर तुमच्या बँकेत जाऊन आधार लिंकिंग तपासून घ्या.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply