जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल (लेवा) भवनात श्री लेवा गुर्जर सेवा प्रतिष्ठान जळगावतर्फे लेवा गुर्जर समाजातील युवक-युवतींचा राज्यस्तरीय परिचय मेळावा रविवारी, एक नोव्हेंबरला झाला. या मेळाव्यात देशभरातून समाजातील २८५ युवक-युवतींनी त्यांच्या पालकांसह उपस्थिती देत आपला परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. शांताराम महाजन होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार नंदकिशोर महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
एकत्र कुटुंब पद्धतीचे आवाहन
नवविवाहितांनी एकत्र कुटुंब पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी केले. एकत्र कुटुंबात ज्येष्ठ नातलगांचे आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी असतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सर्व युवतींनी व युवकांनी लग्नाअगोदर मर्यादेच्या बाहेर जाणाऱ्या अपेक्षा व्यक्त करू नयेत, असा सल्लाही देण्यात आला. मर्यादित अपेक्षा ठेवून आपुलकीच्या आणि बांधिलकीच्या वर्तनातून कौटुंबिक वातावरण सुखमय ठेवता येते, असा संदेश या मार्गदर्शनातून देण्यात आला.
सासर-माहेरचा समतोल राखण्याचा सल्ला
विवाहानंतर सासू-सासऱ्यांनी घरी आलेल्या सुनेला मुलगी म्हणून स्वीकारून आपुलकीने वागवावे, असे मान्यवरांनी सांगितले. त्याचप्रमाणे युवतींनी सासरी आल्यावर सासू-सासरे हेच आपले आईवडील आहेत, या भावनेने वागावे, असा सल्ला देण्यात आला. कुटुंबातील ज्येष्ठांच्या जुन्या विचारसरणीवर वादविवाद न करता त्यांना समजून घ्यावे, यावरही भर देण्यात आला. विवाहानंतर कन्या सासरी गेल्यावर तिच्या वैवाहिक जीवनात वारंवार हस्तक्षेप न करता तिचा संसार सुरळीत चालू द्यावा, अशी सूचना सर्व युवतींच्या आई-वडिलांना देण्यात आली. यामुळे वैवाहिक जीवन घटस्फोटापर्यंत जाण्याची वेळ येऊ नये, याकडे लक्ष वेधण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसचिव सुनील चौधरी यांनी केले, तर सूत्रसंचालन क्रांती पाटील यांनी केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply