मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

नाशिकचा बाजार उजळला; दिवे, पूजासाहित्य खरेदीला उधाण

दिवाळी जवळ आल्याने नाशिकच्या बाजारपेठेत खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला. पूजासाहित्य, आकर्षक पणत्या व रंगीबेरंगी दिव्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी आहे.

नाशिकचा बाजार उजळला; दिवे, पूजासाहित्य खरेदीला उधाण

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नाशिक शहराच्या बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पूजासाहित्य, आकर्षक पणत्या, रंगीबेरंगी दिवे आणि सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली असून खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. यामध्ये विशेषतः महिला वर्गाकडून खरेदीला अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लक्ष्मीपूजनाच्या साहित्याला मागणी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात लहान-मोठ्या आकारांतील तसेच विविध आकर्षक डिझाईन्सचे दिवे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. पारंपरिक मातीच्या पणत्यांसोबतच रंगीबेरंगी, नक्षीकाम केलेले आणि आकर्षक विद्युत रोषणाईचे दिवे ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. दिवाळीच्या काळात घर, अंगण, व्यावसायिक ठिकाणे आणि संपूर्ण परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघत असल्याने या दिव्यांना मोठी मागणी आहे. याचबरोबर लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीलाही उधाण आले आहे. केरसुणी, चौरंग, पाट, बोळके, बत्ताशे, करगोटे यांसह विविध पूजा साहित्याच्या वस्तू बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. पूजेसाठी आवश्यक सर्व वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने नागरिक बाजारपेठेत गर्दी करत आहेत. रविवार कारंजा आणि गाडगे महाराज पुतळा ते बादशाही कॉर्नर या बाजारपेठा पूजासाहित्य आणि पणत्यांच्या विक्रीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यानुसार सोमवारी (ता. २) रविवार कारंजा तसेच गाडगे महाराज पुतळा चौक ते बादशाही कॉर्नर परिसरात खरेदीसाठी नागरिकांची मोठी वर्दळ दिसून आली. सणासाठी आवश्यक साहित्याची खरेदी वेळेत पूर्ण करण्यासाठी महिलांची विशेष लगबग सुरू होती. दिवाळीच्या या तयारीमुळे बाजारपेठेतील लहान-मोठ्या विक्रेत्यांमध्येही कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

दिव्यांवर आधुनिकतेची छाप

दिवाळीनिमित्त पूर्वी घरोघरी हाताने मातीच्या पणत्या तयार केल्या जात होत्या. बाजारातही साध्या, लहान-मोठ्या आकारांतील मातीच्या पणत्याच विक्रीसाठी येत असत. मात्र आता प्रत्येक गोष्टीवर आधुनिकतेची छाप पडत असून त्यातून दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या आणि दिवेही सुटलेले नाहीत. तेलाचे वाढते दर आणि बदलती आवड यामुळे आधुनिकतेतून तयार झालेल्या आकर्षक दिव्यांना अधिक पसंती मिळत आहे. त्यानिमित्ताने पाण्यावर पेटणाऱ्या पणत्या आणि इलेक्ट्रिक सेलवर उजळणारे लहान-मोठे, आकर्षक डिझाईनमधील दिवे बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहेत. एकंदरीत, दिवाळीच्या आगमनापूर्वीच दिवे, पणत्या आणि पूजा साहित्याच्या खरेदीने बाजारपेठेत सणाचा प्रकाश आणि उत्साह अनुभवायला मिळत आहे.

स्रोत: मूळ बातमी

प्राची शिंदे

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance