परभणी महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांसह कर्मचाऱ्यांना कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. १० नोव्हेंबरपर्यंत हे कार्यक्रम सुरू राहणार असून, रविवारी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याने कार्यक्रमांची सुरुवात झाली.
बी. रघुनाथ सभागृहात रविवारी वर्धापन दिनानिमित्त महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर सय्यद इकबाल, आयुक्त नितीन नार्वेकर, उपायुक्त तुकाराम कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध विभागांतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त वसुली लिपिक अंबादास शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत पी. एम. स्वनिधी आत्मनिर्भर योजनेतील लाभार्थी सुनीता त्रिंबक डासाळकर यांनी दहा हजाराच्या कर्जापासून दहा लाखांपर्यंत व्यवसाय वाढवल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. त्यांना सहकार्य करणाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
विविध स्पर्धांसह दिवाळी पहाट
वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंगळवारी महिलांसाठी होममिनीस्टर स्पर्धा, मनपातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी गीतगायन स्पर्धा, तसेच जिल्हा क्रीडा संकुलात पत्रकार व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचा क्रिकेट सामना होणार आहे. या व्यतिरिक्त दिवाळी पहाट या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply