यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पशुपालकांसमोर चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरे जगविणे अवघड होत असल्याने राज्यातील सर्व नोंदणीकृत गोशाळांमधील पशुधनासाठी प्रतिदिन प्रतिपशू १०० रुपये चारा अनुदान द्यावे, अशी मागणी गोशाळा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि पशुसंवर्धनमंत्र्यांना यासंदर्भात निवेदन पाठविण्यात आले.
जिल्ह्यात नोंदणीकृत सुमारे ३० गोशाळा असून, यंदा अत्यल्प पावसामुळे चाऱ्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी पशुपालकांसमोर जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. चारा मिळत नसल्याने जनावरांचे संगोपन करणे कठीण झाले आहे. चाराटंचाईमुळे काही भागांतील शेतकरी आपली जनावरे गोशाळांमध्ये आणून सोडत आहेत. मात्र गोशाळांकडेही मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध नसल्याने या जनावरांचा सांभाळ कसा करावा, असा प्रश्न गोशाळाचालकांसमोर निर्माण झाला आहे.
गोशाळांवरील आर्थिक भार वाढला
गोशाळांमध्ये येणाऱ्या जनावरांची संख्या वाढत असल्याने गोशाळांवरील आर्थिक भारही वाढत आहे. त्यामुळे शासनाकडे चारा अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. यावेळी गोशाळा महासंघाचे अध्यक्ष प्रकाशचंद सोनी यांच्यासह विविध गोशाळांचे चालक उपस्थित होते. शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा गोशाळा महासंघाने व्यक्त केली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply