आनंदाचा आणि प्रकाशाचा महाउत्सव असणाऱ्या दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक असताना धुळे शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. घराघरांमध्ये रोषणाई आणि गृहसजावटीच्या तयारीला वेग आला असून, यंदाच्या दिवाळीत पारंपरिक मातीच्या कलाकुसरीच्या वस्तू आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे.
शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये पणत्यांची मोठी रेलचेल आहे. साध्या मातीच्या पणत्यांपासून ते आकर्षक रंगीबेरंगी डिझाईन्स, हस्तनिर्मित आणि सुंदर नक्षीकाम केलेल्या पणत्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेषतः मातीच्या नक्षीदार पणत्या आणि बाजारात नव्याने दाखल झालेल्या पाण्यावर पेटणाऱ्या दिव्यांनी ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. स्थानिक कुंभार कारागिरांनी तयार केलेल्या पारंपरिक मातीच्या दिव्यांना मोठी मागणी असून, यामुळे या कारागिरांना आर्थिक आधार मिळत आहे.
पणत्यांचे दर काय आहेत
साध्या मातीच्या पणत्यांचे दर सहा नगांसाठी २० रुपयांपासून सुरू होतात, तर आकर्षक रंगीत पणत्या प्रतिनग २० रुपयांपासून उपलब्ध आहेत. मातीच्या पणत्यांव्यतिरिक्त बाजारात नावीन्यपूर्ण वस्तूंनीही बाजारपेठ फुलून गेली आहे. गुजरातमधील लाल मातीपासून तयार करण्यात आलेल्या आकर्षक कलाकुसरीच्या पणत्या महिला ग्राहकांना विशेष आकर्षित करत आहेत.
आधुनिक रोषणाईलाही पसंती
आधुनिकतेची जोड देत इलेक्ट्रिक पणत्या, एलईडी दिवे, मातीचे कंदील आणि मेटल व पत्रापासून बनवलेल्या आकर्षक दिव्यांनी बाजारपेठेची रोषणाई वाढवली आहे. आधुनिक दिव्यांची चमक वाढली असली तरी पारंपरिक मातीच्या दिव्यांचे महत्त्व आजही कायम आहे. मातीचे झुंबर, मातीचे कंदील आणि मातीचे दिवे-झुंबर साधारण १०० ते ५०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मातीचे आकाशकंदील, आकर्षक तोरण, नक्षीकाम असलेले दिवे आणि लहान मुलांसाठीचे मातीचे गोलक अशा विविध गृहसजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. घराच्या प्रवेशद्वारापासून ते बाल्कनी, खिडक्या आणि अंगणापर्यंत सजावटीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रोषणाईचा वापर केला जात आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply