दिवाळीत आपल्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना तसेच उद्योग-व्यवसाय क्षेत्रात कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. भेटवस्तू देणे हा आनंदाचा सोहळा मानला जातो. यंदा दिवाळीनिमित्त कस्टमाइज्ड भेटवस्तूंचा ट्रेंड वाढला असून, त्यामुळे नाशिकची बाजारपेठ बहरली आहे. ग्राहकांचा भर आता डिझायनर पॅकिंगवर अधिक दिसून येत आहे.
फराळापासून क्रॉकरीपर्यंत पसंती
भेटवस्तू म्हणून सुकामेव्याचे विविध प्रकार, सुगंधी उटणे, तेल, साबण, अभ्यंग तेल, महिलांसाठी कस्टमाइज मेकअप किट, कमी ग्रॅममध्ये मिळणारी ज्वेलरी, चॉकलेट बुके, स्वयंपाकघरात वापरली जाणारी क्रॉकरी तसेच दीर्घकाळ टिकणारी मिठाई आणि फराळाच्या पदार्थांना प्राधान्य दिले जात आहे. भेटवस्तू देताना तिचा उपयोग होईल, या दृष्टीने वस्तूंची निवड केली जाते. दरवर्षी सुकामेव्याला अधिक पसंती मिळते. सुकामेवा असलेल्या वस्तूंचे पॅकिंग करताना विक्रेते विशेष काळजी घेतात आणि त्यासाठी खास बॉक्स डिझाइन केले जातात.
काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या छोट्या जारमध्ये सुकामेवा, फराळाचे पदार्थ आणि मिठाई ठेवली जाते. पॅकिंगसाठी खास डिझायनर पिशव्या तयार केल्या जातात. गिफ्ट हॅम्पर आणि पोटलीसारख्या तयार पिशव्यांना गोंडा लावून, विविध रंगांत सजवून विशिष्ट बॉक्समध्ये ठेवले जाते आणि गिफ्ट पेपरने पॅकिंग केली जाते. त्यावर लेस लावून दिवाळीचा संदेश लिहिला जातो, तर काही ठिकाणी प्रत्येक भेटवस्तूसोबत खास पत्रातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. या भेटवस्तू पाचशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार तयार करून मिळतात. पाचशे रुपयांच्या बॉक्समध्ये चार ते पाच प्रकारच्या वस्तू, तर पाच हजार रुपयांच्या बॉक्समध्ये पंधरा प्रकारच्या वस्तू ठेवल्या जातात.
बॉक्सचे प्रकार आणि विक्रीचा अंदाज
भेटवस्तूंच्या बॉक्समध्ये साधा कार्डबोर्ड बॉक्स, लाल-सोनेरी प्रीमियम बॉक्स, पारदर्शक झाकणाचा ट्रे, पुन्हा पुन्हा वापरता येणारा लाकडी बॉक्स, जार गिफ्ट सेट आणि सजावटीची टोपली यांचा समावेश आहे. दुष्काळामुळे यंदा प्रतिसाद कसा मिळेल, हे येणाऱ्या काळात कळेल, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी दिवाळीत पाच हजारांहून अधिक भेटवस्तूंची विक्री झाली होती, अशी माहितीही देण्यात आली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply