छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या कृषी विभागासह सर्वच यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या आहेत. लोकसहभाग हा या प्रयत्नांतील अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने त्याचा अंतर्भाव एकूण आराखडा आणि नियोजनात करावा, असेही त्यांनी सांगितले.
दुष्काळ व्यवस्थापनावर कार्यशाळा
एमजीएम कृषी विज्ञान केंद्र, गांधेली आणि छत्रपती संभाजीनगर कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेच्या वतीने शेतकरी, कृषी सखी तसेच कृषी विभागाच्या गाव, मंडळ आणि तालुका स्तरावरील यंत्रणांतील व्यक्तींसाठी शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ‘दुष्काळजन्य परिस्थितीतील कृषी व्यवस्थापन’ हा या कार्यशाळेचा विषय होता. याप्रसंगी जिल्हाधिकारी गौडा बोलत होते.
या वेळी एमआयटीचे महासंचालक मुनीष शर्मा, एमजीएम कॅम्पस गांधेलीचे संचालक डॉ. के. ए. धापके, सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाचे सुहास आजगावकर, आत्माचे प्रकल्प उपसंचालक तथा विभागीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अभयकुमार पडिले, मॅजिक इनक्युबेशन सेंटरचे संचालक आशिष गर्दे आणि लघुउद्योग भारतीचे उपाध्यक्ष रवी वैद्य उपस्थित होते.
पाणी, चारा आणि जलतारा नियोजनावर भर
एप्रिल-मे महिन्यात दुष्काळाची तीव्रता काय असेल याचा अंदाज घेऊन आतापासूनच काम करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे, चाऱ्याची उपलब्धता लक्षात घ्यावी, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार यावर काम करावे तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये १००० जलतारा प्रकल्पांचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
कार्यशाळेत प्रास्ताविक डॉ. धापके यांनी केले, तर एमआयटीचे महासंचालक शर्मा यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन वैशाली देशमुख यांनी केले आणि आभार एमजीएम कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक काकासाहेब सुकासे यांनी मानले. कार्यशाळेला जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी सखी आणि शेतकरी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply