गोदावरीच्या उगमस्थानाजवळील त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थाच्या परिसरात शनिवारी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी धर्मध्वज उभारण्यात आला आणि त्यासोबत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वाला औपचारिक सुरुवात झाली. वेदमंत्रांचा घोष, शंखनाद आणि गोदावरीचे पूजन अशा मंगल वातावरणात हा सोहळा पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शृंगेरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य विधी झाला.
त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी ध्वजारोहण होत असल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नाशिक येथे, तर मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबकेश्वर येथे उपस्थित होते. कुशावर्त तीर्थावर संत-महंतांचे स्वागत करण्यात आले. पवित्र जलाचे पूजन करून विश्वकल्याणाचा संकल्प सोडण्यात आला. गणेशपूजन, देवतांचे आवाहन, गोदावरी गंगा प्रार्थना आणि सामूहिक प्रार्थनेतून हे पर्व निर्विघ्नपणे पार पडावे, अशी प्रार्थना करण्यात आली.
ध्वजस्तंभ आणि ध्वजपताकांचे पूजन
ध्वजस्तंभाचे पूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, तर ध्वजपताकांचे पूजन शंकराचार्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दोघांनी धर्मध्वजाची प्रदक्षिणा घालून भगवान त्र्यंबकेश्वराचे स्मरण केले. पुरोहितांच्या मंत्रोच्चारादरम्यान शंखनाद झाला आणि धार्मिक जयघोषाने कुशावर्त परिसर दुमदुमून गेला. भगवा धर्मध्वज उंचावताच उपस्थितांनी जयघोष केला आणि सिंहस्थ कुंभमेळ्याला मंगलमय प्रारंभ झाला. १९५६ नंतर प्रथमच त्रिखंडी योग जुळून आल्याने हा कुंभमेळा धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर ध्वजारोहणाचा मान परंपरेने नाभिक समाजाला आहे. यंदाही परंपरेनुसार नाभिक वतनदार संघाला हा मान मिळाला. या सोहळ्याला आमदार, नगराध्यक्ष, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि अन्य प्रशासकीय अधिकारी तसेच संत-महंत, लोकप्रतिनिधी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर गोदावरी नदीची आरती करण्यात आली आणि आरतीचे स्वर, मंत्रोच्चार व शंखनादाने परिसरातील वातावरण अधिकच भक्तिमय झाले.
धर्मध्वजावरील चिन्हे आणि नवीन घाट
धर्मध्वजावर सूर्य, चंद्र, बृहस्पती, सिंह, मगर, ॐकार, स्वस्तिक आणि घंटा अशी विविध धार्मिक व ज्योतिषीय चिन्हे अंकित आहेत. सूर्य-चंद्रांचा संबंध अमृतकुंभाच्या रक्षणाशी, तर बृहस्पती आणि सिंह यांचा संबंध सिंहस्थाच्या कालगणनेशी जोडला जातो. मगर हे गोदावरीच्या तीर्थपरंपरेचे प्रतीक मानले जाते, तर ॐकार आणि स्वस्तिक मांगल्य व कल्याणाचा संदेश देतात. बारा घंटा, दहा दिशा आणि ‘ह्रीं’ या बीजाक्षराचाही ध्वजाच्या रचनेत समावेश आहे.
दरम्यान, पेगलवाडी येथील प्रयागतीर्थाजवळ गोदावरी नदीवर ४.२ किलोमीटरचे नवीन घाट निर्माण करण्यात आले आहेत. या ठिकाणी विधिवत पूजन करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दहा आखाड्यांचे साधू-महंत व सचिव उपस्थित होते. भाविकांना गोदावरी तीर्थात स्नान करणे सुलभ व्हावे, या दृष्टीने हे घाट तयार करण्यात आले असून, तेथे धर्मध्वज उभारल्याने ‘नवीन कुशावर्त’ या नावानेही या घाटांची ओळख निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply