मेगास्टार अमिताभ बच्चन आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांशी नियमित संवाद साधतात आणि त्यांच्या प्रत्येक पोस्टची चर्चा रंगते. नुकत्याच केलेल्या एका सूचक पोस्टमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उपरोधिक शब्दांत व्यक्त केलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
ब्लॉगमधून चाहत्यांशी संवाद
आपल्या ब्लॉगमधून चाहत्यांशी संवाद साधताना त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या. काही दिवसांपूर्वी उघडलेल्या एका पाकिटातील मजकूर त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केला. चाहते जवळ असतात तेव्हा मनाला आनंद मिळतो, असे त्यांनी लिहिले. मात्र, गेल्या रविवारी चाहत्यांची गर्दी पांगली आणि त्यांच्यात काहीसे अंतर निर्माण झाले. असे असले तरी चाहत्यांप्रती असलेले प्रेम, जिव्हाळा आणि आदर यामध्ये कधीही कमतरता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘आमचे स्वतःचे न्यूजपेपर आमच्याकडे आहेत’
पुढे त्यांनी प्रत्येकाची स्वभाववैशिष्ट्ये वेगवेगळी असल्याचे सांगितले. काही जण लहान, तर काही मोठे आहेत; काहींना झोपायला अधिक आवडते, असे मिश्किलपणे नमूद करत या विधानाची हेडलाईन कशी केली जाईल, याचीही त्यांनी जाणीव करून दिली. तसेच, आपल्याबद्दल लिहिणे बंद केले तरी काही फरक पडत नाही, कारण आपले स्वतःचे न्यूजपेपर आता आपल्याकडे आहेत, असे ते म्हणाले. ‘तुम्ही एक पाऊल उचलाल, तर आम्ही शंभर पावले पुढे जाऊ,’ अशा शब्दांत त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. पोस्टच्या अखेरीस ‘तुमचे हत्ती-घोडे घेऊन या, आम्हीही आमची तयारी करून येऊ. हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की!’ असेही त्यांनी लिहिले. या पोस्टचा अर्थ नेमका काय, याबाबत अनेक तर्क लावले जात असून, कोणीतरी त्यांना त्यांच्याबद्दल न लिहिण्याची धमकी देत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अशा धमक्यांना न घाबरता आपला ब्लॉग हाच स्वतःचा न्यूजपेपर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply