ढाका: बांगलादेशच्या हवाई दलाचे माजी अधिकारी के. एम. तहसीफ सौरी यांच्या मृत्यूचे गूढ अधिकच गडद झाले आहे. त्यांचा मृतदेह २८ ऑक्टोबर रोजी ढाक्यातील तुराग नदीत सापडला. त्याआधी ते २४ तासांहून अधिक काळ बेपत्ता होते.
२७ ऑक्टोबर रोजी सौरी हे दुचाकी दुरुस्त करण्यासाठी एका मित्रासोबत घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांचे शव नदीत आढळून आले. या घटनेमुळे त्यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
कुटुंबीयांचा हत्येचा आरोप, पोलिस मौन
२८ वर्षीय सौरी यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांचे वडील आणि चुलत भाऊ यांनी केला आहे. मात्र, या प्रकरणावर पोलिसांनी बोलणे टाळले आहे. त्यामुळे या मृत्यूमागील कारणांबद्दल अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.
मृत्यूच्या सुमारे महिनाभर आधी सौरी यांनी एका पॉडकास्टमध्ये काही महत्त्वाचे विषय मांडले होते. २०२५ मध्ये एका शाळेजवळ लढाऊ विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात ३५ हून अधिक जणांचा जीव गेला होता. त्यानंतर झालेल्या सरकारी कारवाईवर सौरी यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
हसीना यांच्या व्हिडीओपासून चर्चेत
५ ऑगस्ट २०२४ रोजी माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडला. त्यावेळचे फुटेज रेकॉर्ड करण्यात आणि ते शेअर करण्यात सौरी यांची भूमिका असल्याची चर्चा झाली होती. त्यामुळे ते पहिल्यांदा चर्चेत आले. त्यानंतर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.
पॉडकास्टमध्ये त्यांना विचारण्यात आले की, हसीना देश सोडतानाचा व्हिडीओ चित्रित केल्यामुळे तुमची नोकरी गेली का? यावर त्यांनी असू शकतं, असे त्रोटक उत्तर दिले होते.
बांगलादेशच्या राजकीय वर्तुळात सौरी हे भारताच्या गुप्तचर यंत्रणेचे एजंट असल्याची चर्चा सुरू होती. एका स्थानिक वृत्तपत्राने दावा केला होता की, हसीना यांच्या व्हिडीओमागे सौरी आणि हवाई दलाचे आणखी एक अधिकारी लेफ्टनंट रिफत अशरफी यांचा हात होता. ते वृत्तपत्र हसीना सरकारने बंद केले होते आणि डिसेंबर २०२४ मध्ये ते पुन्हा सुरू झाले. हवाई दलाच्या तपास अहवालात अधिकाऱ्यांचे परदेशी गुप्तचर यंत्रणेशी संबंध समोर आल्याचेही म्हटले गेले होते. त्या अहवालात सौरी यांचेही नाव असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे सरकारने त्यांचा पासपोर्ट जप्त केल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, बांगलादेशच्या आंतरसेवा जनसंपर्क संचालनालयाने हे आरोप फेटाळले आहेत. परदेशी गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्यामुळे सौरी यांना सेवेतून निलंबित केल्याचा दावाही या संचालनालयाने फेटाळला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply