लोकप्रिय अभिनेते दादा कोंडके यांचे सिनेमे नेहमीच हाऊसफुल्ल ठरले आहेत. शहर असो की ग्रामीण भाग, दोन्हीकडे दादांच्या सिनेमांना प्रचंड प्रतिसाद मिळायचा. दादांचा सिनेमा येण्याची लोक आतुरतेने वाट पाहायचे, इतकी अफाट लोकप्रियता त्यांची होती. मात्र दादांवर जीव ओवाळून टाकणारे लोक जसे होते, तसेच त्यांना नावं ठेवणारी मंडळीही होती. दादांच्या सिनेमातील गाणी डबल मिनिंगची असतात, दादा अश्लील गाणी लिहितात, असा आरोप त्यांच्यावर सातत्याने केला गेला. या आरोपांना दादांनी सडेतोड उत्तर दिले होते. आता दादांचे आत्मचरित्र लिहिणाऱ्या प्रसिद्ध लेखिका आणि ज्येष्ठ पत्रकार अनिता पाध्ये यांनीही या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.
प्रतिमेवरून जोखले जाते
अनिता पाध्ये यांनी एका वाहिनीला दिलेली जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलाखत जुनी असली तरी त्यांनी दिलेले उत्तर समर्पक आहे. दादांना डबल मिनिंगसाठी नावं ठेवली जातात, पण दादांनी मनोरंजनही तेवढेच केले, असे त्या म्हणाल्या. दादांच्या गाण्यांवर डबल मिनिंग म्हणून टीका केली जाते, मात्र त्याच माणसाने ‘अंजनीच्या सुता…’ हे गाणे लिहिले, त्यावर कुणी बोलत नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले. गुलजार यांचे ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है…’ हे गाणे आयकॉनिक आहे, पण ते गुलजार यांनी लिहिले म्हणून कुणी काही बोलत नाही. तेच दादांनी लिहिले असते तर त्याला डबल मिनिंग म्हटले गेले असते. म्हणजे तुमची प्रतिमा कशी असते त्यावरून लोक तुम्हाला जोखतात, असे अनिता पाध्ये म्हणाल्या.
दहा मिनिटांत शंभर लोक
दादांच्या निधनाच्या आठ दिवस आधीची एक आठवणही पाध्ये यांनी सांगितली. दादांची बहीण लिलाबाई पुण्याला राहायच्या आणि सर्वजण त्यांना आत्याबाई म्हणत. त्यांच्याकडे दादांच्या बालपणीच्या आठवणी होत्या. पाध्ये त्यांना पुण्याला भेटायला गेल्या होत्या आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या. त्या मुंबईला निघणार होत्या, तेव्हा दादा म्हणाले की उद्या तेही मुंबईला जाणार आहेत, त्यामुळे त्या थांबाव्यात आणि सोबत जावे. दुसऱ्या दिवशी ते निघाले तेव्हा दादांची क्रेझ कळली. जिथे जिथे सिग्नल लागायचा, तिथे दादांना बघण्यासाठी प्रचंड गर्दी व्हायची. खोपोलीला दादांच्या फॉर्महाऊसवर पोहोचल्यावर दादा आल्याचे कळताच अवघ्या दहा मिनिटांत शंभर लोक त्यांना पाहण्यासाठी आले होते. आजचे कलाकार विमानतळावर दिसतात, स्वतःच माध्यमांना बोलावतात आणि व्यायामशाळेतील फोटो व्हायरल करतात. चर्चेत राहण्यासाठी ही धडपड असते. पण तुम्ही स्टार आहात तर तसे अंतर राखले पाहिजे, तरच क्रेझ वाढते. रोज रोज दिसल्यावर आकर्षण कसे वाढेल, असा सवाल त्यांनी केला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply