विधान परिषद निवडणुकीच्या निकालावरून भाजपने शिंदे सेनेवर आरोप करण्यास सुरुवात केली असून शिंदे सेनेनेही भाजपला जशास तसे प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे युतीत तणाव निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना या प्रकरणावर भाष्य न करण्याचे आदेश दिले आहेत. आता कुणीही या विषयावर बोलू नका आणि वरिष्ठ पातळीवर आम्ही चर्चा करणार आहोत, असे आदेश शिंदे यांनी दिल्याचे शिंदेसेनेचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
मित्र पक्षावर टीका करू नका
शिवसेनेचा कुठलाही प्रवक्ता, पदाधिकारी किंवा नेता मित्र पक्षावर कुठल्याही प्रकारची टीका करू नये, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. भविष्यात तिन्ही पक्षांमध्ये अधिक चांगला समन्वय कसा राहील, याची वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल आणि हीच अपेक्षा आम्ही आमच्या दोन मित्र पक्षांकडूनही ठेवतो, असे आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.
दोस्तीमध्ये कुस्ती नको
आम्ही चार ठिकाणी युती धर्म पाळला आहे आणि युती धर्म पाळत आलो आहोत, त्यामुळे कोणत्याही प्रकारची टीका करू नये, असे एकनाथ शिंदे यांनी कालच सांगितले आहे. दोस्तीमध्ये कुस्ती होऊ नये, हीच अपेक्षा आम्ही मित्र पक्षांकडून करतो, असे परांजपे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या नक्कीच महायुतीच्या अधिक समन्वयावर चर्चा करतील. पण मित्र पक्षांनीही शिवसेनेवर कुठल्याही प्रकारचे आरोप करणे टाळले पाहिजे आणि मित्र पक्षांच्या प्रवक्त्यांनी व नेत्यांनी त्याबाबतची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन परांजपे यांनी केले.
आजही भाजपच्या प्रवक्त्याने ज्या प्रकारचे शब्द वापरले, ते महायुतीसाठी योग्य नाही, असे परांजपे यांनी म्हटले. मराठी भाषा खूप समृद्ध आहे आणि आमच्याकडेही मराठी शब्दांचा खूप मोठा शब्दकोश आहे, आम्हीही ते शब्द वापरू शकतो, असा इशारा देतानाच महायुतीमध्ये कुठल्याही पक्षावर कुठल्याही प्रकारची टीका होणार नाही, हीच अपेक्षा आम्ही भाजप आणि राष्ट्रवादीकडून ठेवतो, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचाही समाचार घेतला आणि दरेकर यांनी आपल्या मर्यादा ओलांडून टीका करू नये, असे सुनावले. युतीतील हा वाद वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर निवळतो का, हे आता पाहावे लागेल.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply