धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी अजनाळे गावातील पारधी वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेला पूर्वकल्पना न देता अचानक भेट दिली. शाळेची पटसंख्या ४० असताना प्रत्यक्षात केवळ सात विद्यार्थी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश निकृष्ट दर्जाचे आढळले आणि शाळेच्या आवारात घाण दिसून आली. विचारणा केली असता मुख्याध्यापक किशोर धनजी परदेशी गैरहजर असल्याचे समोर आले.
मुख्याध्यापक निलंबित, अधिकाऱ्यांना नोटिसा
या गंभीर बाबींची तात्काळ दखल घेत शिक्षणमंत्र्यांनी मुख्याध्यापक परदेशी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख या संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे निर्देशही देण्यात आले. प्राथमिक शिक्षण विभागाकडून निलंबनाचा प्रस्ताव तयार करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी वैभव बाचकर यांनी दिली.
मनपा शाळेबाबत समाधान, संख्या वाढवण्याचे निर्देश
या कारवाईनंतर शिक्षणमंत्र्यांनी धुळे महापालिकेच्या शाळा क्रमांक २१ या पूर्व प्राथमिक शाळेलाही भेट दिली. तेथील व्यवस्था आणि परिसर पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. पूर्वी मनपाच्या ६५ शाळा होत्या, ती संख्या घसरून सध्या केवळ १६ वर आली आहे, याबद्दल चिंता व्यक्त करत शाळांची संख्या पुन्हा किमान ५० पर्यंत नेऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले. यासाठी ठोस कृती आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचना मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि मनपा शिक्षणाधिकारी दासरवाड यांना देण्यात आल्या.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply