राज्यात पाच जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक झाली. यामध्ये महायुतीला पराभवाचा धक्का बसला, तर महाविकास आघाडीने पाच पैकी तीन जागा जिंकल्या. या निकालानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रात महायुतीला धक्का
या निवडणुकीत दोन शिक्षक आणि तीन पदवीधर मतदारसंघांचा समावेश होता. अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि पुणे शिक्षक मतदारसंघ या दोन जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. मात्र पुणे, मराठवाडा आणि नागपूर या तीनही पदवीधर मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात उघड भूमिका घेतली होती. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला उघड पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपकडून पराभवाचे खापर शिवसेना शिंदे गटावर फोडण्यात येत आहे.
बिहारमध्येही उलटफेर
दुसरीकडे बिहार विधान परिषद निवडणुकीतही मोठा उलटफेर पाहायला मिळाला. दरभंगा पदवीधर मतदारसंघात भाजप उमेदवाराचा पराभव झाला. भाजपने विद्यमान आमदार सर्वेश कुमार यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती. मात्र राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार अनिल झा यांनी सर्वेश कुमार यांचा 450 मतांनी पराभव केला. बिहारमधील आठ विधान परिषद जागांचा निकाल लागला असून, त्यापैकी दोन जागा भाजपला, दोन जागा आरजेडीला, दोन जागा अपक्ष उमेदवारांना, तर प्रत्येकी एक जागा जदयू आणि जन सुराज पार्टीला मिळाली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply