राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिवारी, ३१ ऑक्टोबरला नाशिकमध्ये येणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यानंतर राष्ट्रपती त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट देणार असून मंदिर आणि कुशावर्त तीर्थ येथे त्यांच्या हस्ते पूजन होईल. मात्र या दौऱ्यावर पावसाचे सावट आले असून त्यामुळे राष्ट्रपतींच्या प्रवासाच्या नियोजनात मोठा बदल करावा लागला आहे.
हेलिकॉप्टर प्रवासाला मनाई का?
मूळ नियोजनानुसार राष्ट्रपती नाशिक विमानतळ ते महाराष्ट्र पोलिस अकादमी, तसेच पोलिस अकादमी ते त्र्यंबकेश्वर आणि परत नाशिक असा हेलिकॉप्टरने प्रवास करणार होत्या. महसूल, पोलिस विभाग आणि सुरक्षा यंत्रणा मागील चार दिवसांपासून याच आराखड्यानुसार दौऱ्याची आखणी करत होत्या. या तयारीचा भाग म्हणून नाशिक विमानतळ ते पंचवटीतील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर शहरात रंगीत तालीमही पार पडली होती. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरातील अर्णब चक्रीवादळामुळे नाशिकसह राज्यातील विविध जिल्ह्यांत २९ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टर उड्डाणावर मर्यादा आल्या आहेत.
रस्तेमार्गे प्रवास आणि नवे नियोजन
पर्यायी व्यवस्था म्हणून राष्ट्रपती आता विमानतळ ते नाशिक शहर आणि नाशिक ते त्र्यंबकेश्वर या संपूर्ण प्रवासात वाहनाने प्रवास करतील. राष्ट्रपती रस्तेमार्गे प्रवास करणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याने संपूर्ण मार्गावर सुरक्षा व्यवस्था अधिक व्यापक करावी लागणार आहे. ताफ्याच्या सुरक्षित हालचालींसाठी मार्गावरील बंदोबस्त, बॅरिकेडिंग, पर्यायी मार्ग, वाहतुकीतील बदल आणि महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्थेचा नव्याने आढावा घ्यावा लागणार आहे. तसेच ताफा ज्या मार्गाने प्रवास करणार आहे, त्या रस्त्यांची पाहणी करून आवश्यक डागडुजीचे काम तातडीने हाती घ्यावे लागेल. दौऱ्यात ऐनवेळी बदल करावा लागल्याने सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply