नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शाळा, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि पशुधनाची काळजी यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.
विद्यार्थी आणि शिक्षकांची भूमिका
विद्यार्थ्यांनी शाळेत आणि घरी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भाजी धुतल्यानंतर उरलेले पाणी झाडांसाठी वापरावे, जलस्रोतांची माहिती घ्यावी आणि पाणीबचतीबाबत जागृती करावी, अशा छोट्या कृतींतून जलसंवर्धनाचे संस्कार रुजवावेत, असे प्रशासनाने म्हटले आहे. शिक्षकांनी निबंध, वक्तृत्व, चित्रकला आणि पोस्टर स्पर्धा, प्रभातफेरी, परिसंवाद तसेच पथनाट्यांच्या माध्यमातून पाणीबचत, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि दुष्काळ निवारणाबाबत जनजागृती करावी, असे सुचवण्यात आले आहे.
पालक आणि शाळांनी कृती आराखडा तयार करावा
पालकांनी घरातील पाण्याचा काटकसरीने वापर करावा, नळांची गळती तातडीने दुरुस्त करून घ्यावी आणि मुलांमध्ये वृक्षसंवर्धन, स्वच्छता व निसर्गप्रेमाचे संस्कार रुजवावेत. सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करून प्रदूषण टाळावे. दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी आणि पशुपालक कुटुंबांना चारा व पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुख्याध्यापकांनी शाळास्तरावर पाणीबचत व पर्यावरण संवर्धन समिती स्थापन करावी, शाळेतील जलस्रोतांची तपासणी करावी, पाण्याची गळती रोखावी आणि आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या सहभागातून दुष्काळ निवारणासाठी कृती आराखडा तयार करून स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधावा, असेही सांगण्यात आले आहे. ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा; जनावरे जगवा, शेतकऱ्यांना साथ द्या आणि पर्यावरण जपा,’ हा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply