बदलते हवामान, वाढते वायुप्रदूषण आणि हवेतील धूळ यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेक मुलांना सतत खोकला, घशात खवखव आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. पालक अनेकदा हा खोकला हवामानातील बदल किंवा सर्दीमुळे होतो असे समजतात. मात्र, खोकला अनेक दिवस कायम राहत असेल किंवा वारंवार होत असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
मुलांना प्रदूषणाचा अधिक त्रास का होतो?
मुलांची फुफ्फुसे पूर्णपणे विकसित झालेली नसतात आणि मोठ्या माणसांच्या तुलनेत त्यांचा श्वास घेण्याचा वेग जास्त असतो. त्यामुळे श्वासातून जास्त प्रमाणात प्रदूषित घटक शरीरात जातात. वाहनांचा धूर, बांधकामातील धूळ आणि हवेतील बारीक धूलिकणांमुळे मुलांच्या श्वसनमार्गाला सूज येऊ शकते. त्यामुळे खोकला, छातीत घरघर आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. दमा किंवा अॅलर्जी असलेल्या मुलांना याचा अधिक त्रास होण्याची शक्यता असते. विषाणू आणि जिवाणूंच्या संसर्गामुळेही खोकला, ताप, नाक बंद होणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
डॉक्टरांचा सल्ला काय आहे?
पुण्यातील मदरहूड हॉस्पिटलचे वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारिख यांनी सांगितले की, मुलांना सतत खोकला येत असेल, खोकल्याचे प्रमाण वाढत असेल किंवा वारंवार हा त्रास होत असेल तर पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. खोकल्यासोबत ताप, वेगाने श्वास घेणे, छातीत दुखणे, दूध किंवा जेवण न जाणे आणि सतत थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसत असतील तर संसर्गाची शक्यताही तपासणे गरजेचे आहे. काही वेळा न्यूमोनियाची सुरुवातही साध्या सर्दीसारख्या लक्षणांनी होते. खोकला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहत असेल तर क्षयरोगाची तपासणी करणे गरजेचे आहे. छातीचा एक्स-रे आणि काही आवश्यक चाचण्यांच्या मदतीने याचे निदान करता येते.
मुलांना जोरात श्वास घेण्यास त्रास होत असेल, श्वास घेताना छाती आत ओढली जात असेल, ओठ निळसर पडत असतील किंवा बोलताना आणि दूध पिताना त्रास होत असेल तर तातडीने डॉक्टरांकडे जावे. प्रदूषणाचा परिणाम मोठ्यांवरही होत असून, गेल्या १५ ते २० दिवसांत सतत खोकल्याच्या तक्रारी घेऊन अनेक रुग्ण ओपीडीत आले आहेत, असे अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खोकल्याची औषधे, अँटिबायोटिक्स किंवा घरगुती उपचार करू नयेत, असेही तज्ज्ञांनी सांगितले. ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी असून, कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा