हिवाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत फिरायचे असेल, तर विदर्भ हा एक सुंदर पर्याय ठरू शकतो. घनदाट जंगलं, वन्यजीव, ऐतिहासिक मंदिरं आणि निसर्गरम्य डोंगररांगा असलेला विदर्भ हिवाळ्यात आणखी सुंदर दिसतो. थंडगार हवेत शांत वातावरण अनुभवायचे असेल, तर येथील काही खास ठिकाणांना नक्की भेट द्यावी.
थंड हवेचे हिल स्टेशन आणि धार्मिक स्थळे
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे विदर्भातील एकमेव प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. थंडगार वातावरण, खोल दऱ्या, हिरवीगार जंगलं आणि सुंदर व्ह्यू पॉइंट्स यामुळे हिवाळ्यात येथे फिरण्याचा आनंद वेगळाच असतो. पंचबोल पॉइंट, गाविलगड किल्ला आणि भीमकुंड ही येथील प्रमुख आकर्षणं आहेत. नागपूरपासून जवळ असलेले रामटेक धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. जवळच असलेल्या खिंडसी तलावामुळे सहलीत नौकाविहाराचा आणि निसर्गरम्य वातावरणाचाही आनंद घेता येतो.
वन्यजीव, धरणं आणि नैसर्गिक सरोवर
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वन्यजीवप्रेमींसाठी खास ठिकाण आहे. घनदाट जंगल, तलाव, विविध पक्षी आणि वाघांचे दर्शन यामुळे येथे पर्यटकांची गर्दी असते. हिवाळ्यात आल्हाददायक हवामानात जीप सफारीचा अनुभव घेता येतो. नागपूर जिल्ह्यात रामटेकजवळ पेंच नदीवर तोतलाडोह धरण आहे. धरणाचा विस्तीर्ण जलाशय आणि आजूबाजूचा हिरवागार परिसर निसर्गप्रेमींना आकर्षित करतो. नागपूरपासून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर खापा परिसरात खेकडानाला हे सुंदर धरण आणि जलाशय आहे. डोंगररांगा, जंगल आणि पाण्याने वेढलेला परिसर यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी आकर्षक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले नैसर्गिक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. सरोवराचा अनोखा आकार, आजूबाजूची हिरवळ आणि ऐतिहासिक मंदिरे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
प्रतिक्रिया व्यक्त करा