अमेरिकन मॉडेल केंडल जेनर सध्या सोशल मीडियावर मोठ्या वादात सापडली आहे. तिने स्विमवेअरवर ‘ओम’ चिन्ह असलेलं वस्त्र परिधान केल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक भारतीय वापरकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. धार्मिक चिन्हाचा फॅशनसाठी असा वापर योग्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
३१ वर्षीय केंडल तिची बहीण कायली जेनरसोबत बहामासला सुट्टीवर गेली होती. तिथे तिने काळ्या रंगाची टू-पीस बिकिनी घातली असून, तिच्या कमरेभोवती ‘ओम’ चिन्ह छापलेला पिवळ्या आणि लाल रंगाचा कापड गुंडाळला होता. कायलीने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये दोन्ही बहिणी एकमेकींना मिठी मारताना दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये त्या समुद्रासमोर पोज देत आहेत.
बहामासमधील सुट्टीदरम्यानचे फोटो व्हायरल
केंडल आणि कायली या बहिणी हेली बीबरचा ३० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी बहामासला गेल्या होत्या. याचदरम्यानचे हे फोटो समोर आले. फोटोंमध्ये कायलीने व्ही-नेकलाइन आणि शीअर डिझाइन असलेला फिटिंगचा काळ्या रंगाचा मिडी ड्रेस घातला आहे. फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या विषयावर आपली मतं मांडली.
नेटकऱ्यांचा आक्षेप काय?
अनेक भारतीय वापरकर्त्यांनी ‘ओम’ हे हिंदू धर्मातील पवित्र प्रतीक असल्याचं सांगत, त्याचा बीचवेअर म्हणून वापर लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या मते, धार्मिक श्रद्धा आणि परंपरांचा आदर राखला गेला पाहिजे. फॅशनच्या नावाखाली धार्मिक चिन्हाचा वापर करणं योग्य नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.
केंडल जेनर ही अमेरिकन मॉडेल आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटी आहे. ‘कीपिंग अप विथ द कार्दशियन्स’ या शोमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. ती २००७ ते २०२१ या जवळपास १५ वर्षांच्या कालावधीत रिअॅलिटी मालिकेच्या २० सीझनमध्ये दिसली होती. तसेच ती ‘कोर्टनी अँड क्लो टेक मायामी’, ‘कोर्टनी अँड किम टेक न्यूयॉर्क’ आणि ‘लाइफ ऑफ कायली’ यांसारख्या अनेक स्पिन-ऑफ मालिकांमध्येही झळकली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा