भारतीय दुचाकी बाजारात 500cc सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आपली नवी Honda CB500 बाइक भारतात लॉन्च केली आहे. 501cc क्षमतेचे दमदार इंजिन आणि तीन वेगवेगळे व्हेरिएंट्स ही या बाइकची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. 2020 मध्ये रॉयल एनफिल्डने आपले 500cc मॉडेल्स बंद केल्यानंतर या सेगमेंटमध्ये फारशी नवी उत्पादने पाहायला मिळाली नव्हती. आता होंडाच्या नव्या बाइकच्या आगमनामुळे ग्राहकांना आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. कंपनीने बाइकची बुकिंग सुरू केली असून 2026 च्या अखेरपर्यंत ग्राहकांना डिलिव्हरी देण्याचे नियोजन केले आहे.
इंजिन आणि कामगिरी
Honda CB500 मध्ये 501cc क्षमतेचे एअर आणि ऑइल कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5,250rpm वर 28hp पॉवर आणि 3,750rpm वर 43.3Nm टॉर्क निर्माण करते. होंडाच्या भारतीय पोर्टफोलिओमधील ही सर्वात मोठी एअर कूल्ड सिंगल सिलेंडर बाइक आहे. बाइकमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप अँड असिस्ट क्लच देण्यात आला आहे.
ब्रेकिंगसाठी पुढील आणि मागील दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. यासोबत ड्युअल चॅनल ABS देखील मिळते. पुढे 19 इंच आणि मागे 17 इंच आकाराचे व्हील्स आहेत. सस्पेंशनसाठी टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस प्रीलोड अॅडजस्टेबल गॅस चार्ज्ड ट्विन शॉक देण्यात आले आहेत. बाइकचे वजन 189 किलो असून तिला 168mm ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. तुलनेत Honda CB350 चे वजन 181 किलो, तर Royal Enfield Classic 350 चे वजन 195 किलो आहे. त्यामुळे शहरातील प्रवासासोबतच लांबच्या राइडसाठीही ही बाइक एक पर्याय ठरू शकते.
व्हेरिएंट, किंमत आणि फीचर्स
कंपनीने ही बाइक Alloy, Spoke आणि टॉप व्हेरिएंट अशा तीन पर्यायांमध्ये सादर केली आहे. Alloy व्हेरिएंटची किंमत 2.75 लाख रुपये आहे. Spoke व्हेरिएंटसाठी 3 लाख रुपये, तर टॉप मॉडेलसाठी 3.02 लाख रुपये मोजावे लागतील. बेस व्हेरिएंटमध्ये Pearl Igneous Black आणि Pearl Deep Ground Gray हे रंग मिळतात. मिड व्हेरिएंट Rebel Red Metallic आणि Matt Steel Silver Metallic रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर टॉप मॉडेलमध्ये Pearl Igneous Black रंगासह आकर्षक स्ट्राइप्स देण्यात आले आहेत.
या बाइकमध्ये Honda Selectable Torque Control (HSTC), अॅनालॉग आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल तसेच Honda RoadSync कनेक्टिव्हिटी मिळते. 500cc सेगमेंटमध्ये नव्या पर्यायाची वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी ही बाइक एक महत्त्वाची भर ठरू शकते.
प्रतिक्रिया व्यक्त करा