कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळच्या निवडणुकीत संचालक नेमण्याच्या प्रक्रियेसाठी शासनाकडून ८० लाख रुपये खर्च झाल्याचा मुद्दा समोर आला आहे. या खर्चावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुण्यातील नेते रवींद्र धंगेकर यांनी आक्षेप घेतला आहे. शेतकऱ्यांनी शून्यातून उभी केलेल्या संस्थेत सरकारने एवढा मोठा आर्थिक हस्तक्षेप का केला, आणि हा निधी नक्की कोणाला व कशासाठी दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दुष्काळ असताना खर्चावर प्रश्न
राज्यात दुष्काळाची परिस्थिती असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण आणि लग्नकार्य यांसारख्या अडचणी असताना सरकारने राजकारणावर कोट्यवधी रुपये खर्च करणे चुकीचे आणि लोकशाहीविरोधी असल्याचे धंगेकर यांनी म्हटले आहे.
खरात बाबा प्रकरणावरही सवाल
खरात बाबा प्रकरणात रूपाली चाकणकर यांची विविध संस्था आणि ईडीमार्फत चौकशी झाली, मात्र सात-आठ महिने उलटूनही तो चौकशी अहवाल अद्याप जनतेसमोर आलेला नाही, असा प्रश्न धंगेकर यांनी उपस्थित केला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याच आश्रमाला कोट्यवधी रुपयांचा शासकीय निधी दिला आणि त्यांच्या पाया पडतानाचे फोटो समोर आल्याचा आरोपही त्यांनी केला. रूपाली चाकणकर यांच्यावर कारवाई होते, मग आपल्याच पक्षाचे नेते असल्यामुळे चंद्रकांत पाटलांना सूट दिली जात आहे का, असा सवाल करून मुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करावा आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून पाटलांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी धंगेकर यांनी केली.
पुण्यात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईवर बोलताना धंगेकर म्हणाले की, काही ठिकाणी या कारवाईचे स्वागत होत आहे, तर काही नागरिक आणि व्यापारी नाराज आहेत. ही कारवाई पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहूनच झाली पाहिजे, कोणावरही अन्याय होऊ नये आणि अधिकारी नियमबाह्य वागत असल्यास त्याची सखोल तपासणी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
Leave a Reply