मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय विनोदी कलाकार आणि अभिनेता कुशल बद्रिके आपल्या विनोदी शैलीतील समाजमाध्यमांवरील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने आपल्या आयुष्यातील पसारा आणि तो आवरण्यास मदत करणाऱ्या एका खास व्यक्तीविषयी मजेशीर पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चेत आहे.
कुशलने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एखादी गोष्ट आवरायची म्हटलं की त्याच्याकडून आधी पसारा होतो. ‘पसारा आणि आयुष्य मला दोन्ही आवरता आले नाहीत’, असेही त्याने विनोदी शैलीत लिहिले आहे. मात्र, या सगळ्यात एक व्यक्ती त्याच्या मदतीला कायम धावून येते. तिला प्रत्येक गोष्ट जागेवर ठेवता येते आणि अनेकदा तिने आपल्याला आपली जागा दाखवून दिली आहे, असे कुशलने म्हटले आहे.
‘जागेवाला’ शब्दाची गंमत
कुशलने या पोस्टमध्ये त्या व्यक्तीचा उल्लेख ‘जागेवाला’ असा केला आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने तो जर्मनीला निघाला होता. त्यावेळी या ‘जागेवाल्या’नेही आपल्यासोबत येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर ‘जागेवाल्याला दुखावून चालत नाही, बाबा!’ अशी मिश्किल टिप्पणी कुशलने केली आहे. पोस्टच्या शेवटी ‘जागा बदलली म्हणून जागेवाला बदलत नाही’, अशी भन्नाट तळटीपही त्याने लिहिली आहे.
कुशलच्या या पोस्टमधील शब्दांची निवड आणि त्याची विनोदी शैली चाहत्यांना भावत आहे. विशेष म्हणजे, ‘जागेवाला’ हा शब्द त्याने पत्नी सुनयनासाठी वापरला आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Leave a Reply