सध्या सोन्याच्या बाजारात ज्या घडामोडी घडत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य आनंदात आहेत. कारण सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने घसरण होत आहे. अशा वेळी गुंतवणूकदार घाबरून पैसा काढून घेत आहेत. बाजारात ही भीती असताना कॅनडामधील अब्जाधीश गुंतवणूकदार प्रेम वत्सा यांनी मात्र एकदम उलटी चाल खेळली आहे.
दोन खाण कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक
आपल्या गुंतवणुकीच्या शैलीमुळे प्रेम वत्सा यांना कॅनडाचे वॉरेन बफेट म्हटले जाते. वत्सा यांनी सोन्याच्या खाणीशी संबंधित दोन मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा लावला आहे. त्यांच्या विमा आणि गुंतवणूक कंपनी फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जच्या तिसऱ्या तिमाहीचा अहवाल समोर आला आहे. संशोधन मंच गुरुफोकसनुसार कंपनीच्या अमेरिकी शेअर पोर्टफोलियोमध्ये एकूण ३४ शेअर्स आहेत. त्याची किंमत जवळपास २.६५ अब्ज डॉलर आहे. यात ४४.४ टक्के हिस्सा दोन गोल्ड मायनिंग कंपन्यांचा आहे.
कंपनीने इक्विनॉक्स गोल्डमध्ये नवीन गुंतवणूक करत ५.८४ कोटी शेअर्स विकत घेतले आहेत. त्याची किंमत ६४.९ कोटी डॉलर असून हा एकूण पोर्टफोलियोच्या २४.५१ टक्के हिस्सा आहे. एल्डोराडो गोल्डमध्ये जवळपास ५२.७ कोटी डॉलरची, म्हणजे १९.८९ टक्के हिस्सेदारी कायम ठेवली आहे. दोघांमधील एकूण गुंतवणूक १.१७ अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. याच तिमाहीत कंपनीने ओरला मायनिंगमधून पैसा काढून घेतला. १३एफ फायलिंगमध्ये फक्त अमेरिकी शेअर्सची माहिती असते. त्यात वत्सा यांचे लक्ष्य काय आहे, हे सांगितलेले नाही.
खाण कंपन्यांचे शेअर्स का फायद्याचे?
थेट सोने खरेदी करण्यापेक्षा खाण कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसा लावणे जास्त फायद्याचा सौदा ठरू शकतो. या कंपन्या बाजारभावाने सोने विकतात. मजूर, वीज आणि यंत्रांचा खर्च ठरलेला असतो. सोन्याचे भाव खर्चाच्या तुलनेत वेगाने वाढतात, त्यामुळे या कंपन्यांचा नफा अनेक पटींनी वाढतो. यात धोका सुद्धा असतो. सोन्याचे भाव दीर्घकाळासाठी पडले किंवा खाणीतील काम थांबले, तर या शेअर्सवर मोठे नुकसान होऊ शकते.
आठ महिन्यांतील सर्वांत मोठी साप्ताहिक घसरण
रॉयटर्सनुसार २० नोव्हेंबरला स्पॉट गोल्ड कोसळून ३५८५.९२ डॉलर प्रति औंस झाले. त्याआधी ते ३५१३.५४ डॉलरपर्यंत घसरले होते. सप्टेंबर २०२५ नंतरचा हा सर्वांत खालचा स्तर आहे. एका आठवड्यात सोन्याचे भाव ८ टक्क्यांनी कोसळले आहेत. आठ महिन्यांतील ही सर्वांत मोठी साप्ताहिक घसरण आहे.
Leave a Reply