कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने नोकरदारांना मोठा दिलासा दिला आहे. नोकरी सोडल्यानंतर संपूर्ण भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढण्यासाठीची प्रतीक्षा आता १२ महिन्यांवरून पुन्हा २ महिन्यांवर आणण्यास संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली आहे.
ऑक्टोबर २०२५ मधील बदल मागे
ऑक्टोबर २०२५ मध्ये ही प्रतीक्षा मर्यादा २ महिन्यांवरून १२ महिने करण्यात आली होती. आता पुन्हा जुना नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय पीएफ खात्यात अनिवार्यपणे शिल्लक ठेवण्याची मर्यादा २५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे सदस्यांना त्यांच्या पात्र पीएफ रकमेपैकी ९० टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार आहे.
निवृत्तांसाठी टप्प्याटप्प्याने पैसे काढण्याची सुविधा
निवृत्त कर्मचाऱ्यांसाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना संपूर्ण पीएफ रक्कम एकाच वेळी काढण्याऐवजी मासिक, तिमाही किंवा सहामाही हप्त्यांमध्ये पैसे काढण्याची सुविधा देणाऱ्या सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅनला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या संघटनेच्या २४० व्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. मात्र अंतिम पेन्शन रक्कम काढण्यासाठीची किमान प्रतीक्षा मर्यादा ३६ महिने कायम ठेवण्यात आली आहे. नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीमुळे गरजेच्या वेळी खातेदारांच्या हातात पैसे मिळतील आणि उरलेली रक्कम खात्यात राहून त्यावर व्याजही मिळत राहील.
Leave a Reply