म्हसदी येथील गंगामाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा नरेंद्र देवरे यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबई येथील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटनेतर्फे हा पुरस्कार दिला जातो. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.
बोर्डी (ता. डहाणू, जि. पालघर) येथे झालेल्या संघटनेच्या ६५ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माने, धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय पवार आणि सचिव उदय तोरवणे उपस्थित होते.
पुरस्काराचे स्वरूप
प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह आणि स्नेह वस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्याध्यापिका वर्षा देवरे आणि प्राचार्य नरेंद्र देवरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. श्री धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित गंगामाता कन्या विद्यालयात त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न
मुख्याध्यापिका म्हणून काम करताना विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थिनीला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी वर्षा देवरे यांनी सातत्याने प्रयत्न केले. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जाणीव आणि जीवनमूल्ये रुजावीत, यावर त्यांनी भर दिला. ज्ञान, कर्तृत्व आणि समर्पित सेवाभावातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, संचालक मंडळ आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
Leave a Reply