ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांच्या बांधकामासाठी आगामी पुरवणी मागण्यांमध्ये ६ हजार ८४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली आहे. ओबीसी संदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यात १००, विभागीय स्तरावर २५० क्षमतेची वसतिगृहे
वसतिगृहे उभारण्यासाठी महसूल विभागाच्या अखत्यारीतील जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत झाला. प्रत्येक जिल्ह्यात १०० विद्यार्थ्यांची, तर विभागीय स्तरावर २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली वसतिगृहे बांधली जाणार आहेत. वसतिगृहांचे डिझाइन तयार करण्याचे काम सुरू असून, पुढील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत त्याला अंतिम मान्यता दिली जाईल. त्यानंतर मार्चपासून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याचे नियोजन आहे.
भटक्या समाजासाठी ५०० विशेष शिबिरे
भटक्या-विमुक्त आणि घुमंतू समाजातील नागरिकांना शासकीय कागदपत्रे मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ६, ७ आणि ८ जानेवारीला राज्यभर सुमारे ५०० विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबिरांमधून व्हीजेएनटी प्रवर्गातील जातींच्या नागरिकांना जन्मदाखले, आधारकार्ड आणि अन्य आवश्यक ओळखपत्रे उपलब्ध करून दिली जातील. राज्यातील कोणताही भटक्या-विमुक्त किंवा घुमंतू नागरिक आवश्यक कागदपत्रांपासून वंचित राहू नये, ही या निर्णयामागची भूमिका आहे.
बैठकीत ओबीसी समाजाच्या शैक्षणिक सुविधा, भटक्या-विमुक्त समाजाचे प्रश्न, घरकुल योजना आणि विविध समाजघटकांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. धनगर, वाडी, कोळी यांसह भटक्या-विमुक्त समाजातील विविध घटकांच्या मागण्यांवरही विचार करण्यात आला. या समाजघटकांना घरे, वसाहती आणि जागा उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक विचार झाला.
ही बैठक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे दूरदृश्य प्रणालीद्वारे, ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, बहुजन कल्याण विभागाचे सचिव अप्पासाहेब धुळाज यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसमितीला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त विभागांनी विविध उपक्रम राबवावेत, अशी सूचनाही बैठकीत करण्यात आली.
Leave a Reply