शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

मुंबई क्लायमेट वीकला जागतिक मान्यता; COP31 मध्ये मोठा सन्मान

मुंबई क्लायमेट वीकचा COP31 च्या जागतिक क्लायमेट वीक्स निवेदनात समावेश झाला आहे. न्यूयॉर्क, लंडनसह आठ व्यासपीठांसोबत मुंबई हवामान कृतीसाठी समन्वय साधणार आहे.

मुंबई क्लायमेट वीकला जागतिक मान्यता; COP31 मध्ये मोठा सन्मान

प्रोजेक्ट मुंबईचा उपक्रम असलेल्या मुंबई क्लायमेट वीकला जागतिक पातळीवर मोठी मान्यता मिळाली आहे. जागतिक हवामान कृतीच्या दिशेने समन्वयाने काम करण्यासाठी जगातील आठ प्रमुख हवामानविषयक व्यासपीठांसह मुंबई क्लायमेट वीकचा सामूहिक उपक्रमात समावेश झाला आहे. क्लायमेट वीक्सचे संयुक्त निवेदन COP31 परिषदेत तुर्कियेतील अंताल्या येथे जाहीर करण्यात आले. या निवेदनाच्या घोषणेसाठी आयोजित सत्राचे सहआयोजक म्हणून प्रोजेक्ट मुंबईने सहभाग घेतला आहे.

मुंबई क्लायमेट वीकचे मुख्य संयोजक तसेच प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी या सत्रात मुंबई क्लायमेट वीकचे प्रतिनिधित्व केले. या सत्राचे अन्य सहआयोजक म्हणून क्लायमेट ग्रुप, E3G, OFuturo आणि क्लायमेट चॅम्पियन्स टीम यांनी सहभाग घेतला.

नऊ व्यासपीठांचा संयुक्त उपक्रम

मुंबई क्लायमेट वीक हे जागतिक हवामान कृती कार्यक्रमाशी समन्वय साधण्यासाठी क्लायमेट वीक्सच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्या नऊ व्यासपीठांपैकी एक आहे. यामध्ये बँकॉक क्लायमेट ॲक्शन वीक, बाकू क्लायमेट ॲक्शन वीक, क्लायमेट ॲक्शन वीक सिडनी, क्लायमेट वीक न्यूयॉर्क, लंडन क्लायमेट ॲक्शन वीक, मुंबई क्लायमेट वीक, रिओ क्लायमेट ॲक्शन वीक, साओ पाउलो क्लायमेट वीक आणि UNFCCC सचिवालयाच्या क्लायमेट वीकचा समावेश आहे.

या उपक्रमाला क्लायमेट हाय लेव्हल चॅम्पियन्स टीम आणि झिरो वेस्ट फोरम यांचेही सहकार्य लाभले आहे. क्लायमेट वीक्सच्या माध्यमातून परस्पर समन्वयाने काम करण्याची बांधिलकी प्रथमच व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे वर्षभर राबविण्यात येणाऱ्या जागतिक हवामान कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला दिशा देणाऱ्या निवडक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांमध्ये मुंबईचा समावेश झाला आहे.

हवामान बदलांविषयीची कृती वर्षातील केवळ एका आठवड्यापुरती मर्यादित राहून चालणार नाही, असे शिशिर जोशी म्हणाले. त्यासाठी वर्षभर सातत्य, समन्वय आणि उत्तरदायित्व आवश्यक आहे. फेब्रुवारीमध्ये मुंबईत सुरू झालेल्या उपक्रमांना जूनमध्ये लंडन आणि सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्क येथे पुढे नेता आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आघाडीच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांसह मुंबईचा झालेला समावेश हा जागतिक हवामान कृतीच्या अंमलबजावणी प्रक्रियेत जागतिक दक्षिणेकडील देशांची वाढती भूमिका अधोरेखित करणारा आहे.

मुंबई क्लायमेट वीक 2026 दरम्यान महाराष्ट्र शासनाने स्वच्छ ऊर्जा आणि हवामान बदलांना तोंड देऊ शकणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी खासगी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने गुंतवणूक व्यासपीठ सुरू केले. राज्य शासन आणि WRI India यांनी राज्यातील 44 शहरांमध्ये हवामानविषयक 1,000 हून अधिक प्रकल्पांची यादी जाहीर केली. महाराष्ट्रातील 30 शहरांचा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या पाठबळाने राबविण्यात येणाऱ्या बीट द हीट उपक्रमात समावेश झाला. तसेच ॲक्शन अजेंडा ऑन रिजनरेटिव्ह लँडस्केप्स या उपक्रमांतर्गत भारतात दुसऱ्या कंट्री लँडस्केप ॲक्सिलरेटरची सुरुवात करण्यात आली. 2030 पर्यंत 110 देशांमध्ये 9 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक साध्य करण्याचे उद्दिष्ट असलेल्या जागतिक आघाडीचा हा उपक्रम एक भाग आहे.

दुसरे पर्व फेब्रुवारी 2027 मध्ये

मुंबई क्लायमेट वीकचे दुसरे पर्व 23 ते 26 फेब्रुवारी 2027 या कालावधीत मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात येणार आहे. या चार दिवसीय कार्यक्रमात देश-विदेशांतील शासनाचे प्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर, वित्तीय संस्था, नवोन्मेषक, सामाजिक संस्था आणि हवामान क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. जागतिक दक्षिणेकडील देशांवर लक्ष केंद्रित करून हवामानविषयक उपाययोजनांना गती देणे, सहकार्य वाढविणे आणि प्रत्यक्ष कृतीला प्रोत्साहन देणे हा या आयोजनाचा प्रमुख उद्देश आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance