वाढत्या वयासोबत शरीराच्या अनेक भागांमध्ये बदल होऊ लागतात. त्याचा परिणाम गुडघ्यांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. गुडघे हा शरीरातील महत्त्वाचा सांधा आहे. चालणं, उठणं, बसणं अशा अनेक हालचालींसाठी गुडघ्यांचा उपयोग होतो. आपण टाकत असलेल्या प्रत्येक पावलाचा भारही गुडघ्यांवर पडतो. पण शारीरिक हालचाली कमी झाल्या आणि वय वाढू लागलं की गुडघ्यांचं आरोग्य बिघडू शकतं. त्यामुळे गुडघे मजबूत ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. घरच्या घरी काही सोपे व्यायाम करून गुडघ्यांची ताकद वाढवता येऊ शकते.
गुडघे मजबूत करण्यासाठी ५ सोपे व्यायाम
भिंतीच्या आधाराने स्क्वॉट्स: भिंतीपासून साधारण एक फूट अंतरावर उभे राहा. दोन्ही पाय खांद्यांच्या रुंदीइतके दूर ठेवा. आता पाठीचा भाग भिंतीला टेकवून हळूहळू खाली सरका. यावेळी गुडघे वाकवा, पण गुडघे पायाच्या बोटांच्या पुढे जाणार नाहीत याची काळजी घ्या. त्यानंतर हळूहळू पुन्हा सरळ उभं राहा.
क्लॅमशेल व्यायाम: गुडघ्यांची लवचिकता वाढवण्यासाठी हा व्यायाम फायदेशीर ठरू शकतो. जमिनीवर एका कुशीवर झोपा. दोन्ही गुडघे ९० अंशात वाकवून ठेवा आणि दोन्ही पाय एकमेकांना जोडलेले ठेवा. आता पाय एकत्र ठेवून गुडघे हळूहळू वरच्या बाजूला उघडा आणि पुन्हा बंद करा. शिंपल्याचं तोंड उघडावं आणि बंद व्हावं, तशी ही हालचाल दिसते. २०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, हा व्यायाम केल्याने गुडघा वाकवण्याच्या क्षमतेत सुधारणा झाल्याचं दिसून आलं.
लंजेस: एका पायाने पुढे आणि दुसऱ्या पायाने मागे अशा स्थितीत उभं राहा. उजवा पाय पुढे आणि डावा पाय मागे ठेवा. आता हळूहळू दोन्ही गुडघे वाकवत खाली या. उजवा पाय काटकोनात येईल इतपत खाली जा. त्यानंतर पुन्हा सावकाश सरळ उभं राहा. आता दोन्ही पायांची जागा बदला आणि पुन्हा हाच व्यायाम करा.
मांडीच्या मागच्या स्नायूंचा व्यायाम: खुर्चीच्या कडेला बसा. डावा पाय सरळ ठेवा आणि उजवा पाय गुडघ्यातून वाकवा. सरळ ठेवलेल्या पायाची टाच जमिनीवर टेकवा. आता छातीचा भाग हळूहळू त्या पायाच्या दिशेने पुढे झुकवा. यामुळे मांडीच्या मागच्या बाजूचे स्नायू ताणले जातात आणि गुडघ्याचे स्नायूही आवळले जातात.
हील स्लाइड्स: गुडघ्यांची हालचाल सुधारण्यासाठी आणि त्यांची लवचिकता वाढवण्यासाठी हा व्यायाम उपयोगी ठरतो. पाठीवर झोपा. दोन्ही गुडघे वाकवून पाय जमिनीवर टेकवा. आता एका पायाची टाच जमिनीवरून न उचलता हळूहळू पुढे सरकवा आणि पाय सरळ करा. त्यानंतर पुन्हा टाच मागे सरकवत पाय आधीच्या स्थितीत आणा.
नियमित हालचाल का महत्त्वाची?
गुडघ्यांच्या सांध्यांची नियमित हालचाल होणं महत्त्वाचं आहे. चालणं, स्ट्रेचिंग आणि शरीराची लवचिकता वाढवणारे व्यायाम केल्याने गुडघे सक्रिय आणि मजबूत राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे गुडघ्यांचं आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Leave a Reply