रस्ता दाखवण्यापुरते मर्यादित न राहता गुगल मॅप्स आता दैनंदिन प्रवासातील अनेक अडचणी सोडवू शकते. पार्किंग केलेली जागा नकाशावर जतन करणे, एखाद्या ठिकाणची गर्दी जाण्यापूर्वीच तपासणे आणि इंटरनेट नसतानाही नकाशा वापरणे, या तीन सुविधांमुळे रोजचा प्रवास अधिक सोपा आणि तणावमुक्त होतो.
पार्किंगची जागा जतन करा
मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये, रेल्वे स्थानकावर किंवा गर्दीच्या ठिकाणी गाडी पार्क केल्यानंतर परत आल्यावर ती नेमकी कुठे उभी केली होती, हे अनेकदा आठवत नाही. यावर उपाय म्हणून गाडी पार्क केल्यानंतर गुगल मॅप्स उघडून नकाशावर दिसणाऱ्या सध्याच्या स्थानावर टॅप करावे. तिथे ‘सेव्ह पार्किंग’ हा पर्याय दिसतो. त्यावर क्लिक केल्यावर पार्किंगचे ठिकाण नकाशावर ‘पी’ चिन्हासह जतन होते. परत येताना त्यावर क्लिक करून थेट गाडीपर्यंत पोहोचता येते.
जाण्यापूर्वीच गर्दी तपासा
सुट्टीच्या दिवशी प्रसिद्ध उपाहारगृह, पर्यटनस्थळ किंवा मंदिरात गेल्यावर तिथे प्रचंड गर्दी असते आणि बराच वेळ रांगेत उभे राहावे लागते. हे टाळण्यासाठी ‘पॉप्युलर टाइम्स’ हे वैशिष्ट्य उपयोगी ठरते. ज्या ठिकाणी जायचे आहे, त्याचे नाव गुगल मॅप्सवर शोधून खाली स्क्रोल केल्यावर गर्दीचा आलेख दिसतो. त्या आलेखावरून त्या ठिकाणी कोणत्या वेळी किती गर्दी असते आणि सध्या तिथे प्रत्यक्षात किती गर्दी आहे, याचा अंदाज येतो. त्यानुसार प्रवासाचे नियोजन करता येते.
इंटरनेटशिवाय नकाशा वापरा
डोंगराळ भागात, महामार्गावर किंवा ग्रामीण भागात प्रवास करताना अनेकदा मोबाईल नेटवर्क किंवा इंटरनेट बंद पडते. अशा वेळी रस्ता चुकण्याचा धोका असतो. यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी ज्या भागात जायचे आहे, तो भाग गुगल मॅप्सवर शोधावा. त्यानंतर प्रोफाइल छायाचित्रावर क्लिक करून ‘ऑफलाइन मॅप्स’ निवडून त्या भागाचा नकाशा फोनमध्ये डाउनलोड करून ठेवावा. त्यामुळे इंटरनेट नसतानाही अचूक मार्गदर्शन मिळते. तसेच ‘सेव्ह्ड’ पर्यायाचा वापर करून आवडती ठिकाणे यादीत जतन करून ठेवता येतात.
Leave a Reply