काँग्रेस पक्षाच्या संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. काँग्रेस अध्यक्षांनी विविध राज्यांसाठी, केंद्रशासित प्रदेशांसाठी आणि पक्षाच्या विविध जबाबदाऱ्यांसाठी एकूण ८१ पदाधिकाऱ्यांची एआयसीसी सचिवपदी नियुक्ती केली आहे. आगामी पंजाब आणि उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे फेरबदल करण्यात आले आहेत. या नियुक्त्यांमध्ये महाराष्ट्रासाठी चार सचिवांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातील चार सचिव कोण?
महाराष्ट्रासाठी यू. बी. व्यंकटेश, रेहाना रियाझ चिश्ती, एफ. एच. जक्कप्पाणवर आणि योगेंद्र योगी यांची एआयसीसी सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. यू. बी. व्यंकटेश आणि रेहाना चिश्ती यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. तर, एफ. एच. जक्कप्पाणवर आणि योगेंद्र योगी यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेला यांच्यासोबत चारही सचिव काम करणार आहेत.
महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांची तेलंगणाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, रामकिशन ओझा यांच्याकडे गुजरातची जबाबदारी देण्यात आली आहे. मोहन जोशी यांची कर्नाटकचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रवींद्र दळवी आणि सुरज सिंह ठाकूर यांच्याकडे पंजाबची जबाबदारी आहे. नितीन कुंभलकर यांची कोष विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे.
इतर राज्यांत कोणाला जबाबदारी?
काँग्रेस अध्यक्ष कार्यालयासाठी प्रणव झा आणि गौरव पांधी, तर माध्यम, प्रसिद्धी आणि सोशल-डिजिटल मीडिया विभागासाठी डॉ. विनीत पुनिया आणि रुचिरा चतुर्वेदी यांची नियुक्ती झाली आहे. उत्तर प्रदेशसाठी सहा, तर गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानसाठी प्रत्येकी चार सचिवांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
दुसरीकडे, माजी एआयसीसी सचिव आणि सहसचिवांच्या योगदानाबद्दल पक्षाने आभार मानले असून त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. यामध्ये पृथ्वीराज साठे, अंबा प्रसाद, देवेंद्र यादव, दिव्या मदेर्णा यांसह २५ नेत्यांचा समावेश आहे.
Leave a Reply