सातारा जिल्हा बँकेच्या सत्तास्पर्धेत शिंदेसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येत भाजपला धक्का दिला आहे. अध्यक्षपदासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांची बिनविरोध निवड झाली, तर उपाध्यक्षपदी शिंदेसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची वर्णी लागली. महायुतीतील मित्रपक्षांनीच भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्याने जिल्ह्यातील राजकारणात आगामी काळात संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
झेडपी निवडणुकीचा वचपा
जिल्हा बँकेतील या संघर्षामागे जिल्हा परिषद निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत असताना शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदान केंद्रात जाऊ दिले गेले नव्हते. काही सदस्यांना पोलिसांनी गेटवरच अडवले आणि ताब्यात घेतले. मंत्री शंभूराजे देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्याशी पोलिसांची धक्काबुक्की झाली, त्यात देसाई यांच्या हाताला इजा झाली. मतदानापासून वंचित राहिलेल्या या दोन्ही पक्षांच्या सदस्यांमुळे भाजपकडे बहुमताचे संख्याबळ नसतानाही त्यांनी सत्ता काबीज केली होती. त्याच घटनेचा बदला जिल्हा बँक निवडणुकीत घेतला गेल्याची चर्चा आता रंगली आहे.
पुढील संघर्षाची चिन्हे
दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांनी पुढील काळात संघर्ष होण्याचा इशारा दिला आहे. गोरे यांच्याकडे सातारा जिल्ह्यातील भाजपची जबाबदारी आल्यानंतर महायुतीत अनेकदा वाद उफाळले आहेत. त्यामुळे शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून भाजप हा वाद शमवण्याचा प्रयत्न करणार की जिल्ह्यातील सत्तासंघर्ष असाच सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply