थायरॉईडची समस्या आज अतिशय सामान्य झाली आहे. तरुण वयातही ही समस्या दिसून येत आहे. आहारातील बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि जीवनशैलीतील बदल यांमुळे आरोग्यावर थेट परिणाम होतो. मात्र थायरॉईडची लक्षणे वेळीच ओळखली नाहीत तर गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी आणि उपचार करणे गरजेचे आहे.
थायरॉईड म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते?
मानेच्या पुढील बाजूला असलेली छोटी ग्रंथी म्हणजे थायरॉईड. शरीरातील चयापचय क्रिया, शरीराचे तापमान, हृदयाचे ठोके आणि ऊर्जेचा वापर नियंत्रित करणारे हार्मोन्स ही ग्रंथी तयार करते. गरजेपेक्षा कमी किंवा जास्त हार्मोन्स तयार झाल्यास शरीराच्या विविध अवयवांवर परिणाम होतो.
थायरॉईडचे दोन मुख्य प्रकार आहेत. थायरॉईड ग्रंथीतून आवश्यकतेपेक्षा कमी हार्मोन्स तयार झाल्यास त्याला हायपोथायरॉईडिझम म्हणतात, तर आवश्यकतेपेक्षा जास्त हार्मोन्स तयार झाल्यास त्याला हायपरथायरॉईडिझम म्हणतात. दोन्ही प्रकारांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येतात.
थायरॉईड झाल्यानंतर दिसणारी लक्षणे
वजनात अचानक बदल होणे हे थायरॉईडचे एक प्रमुख लक्षण आहे. हायपोथायरॉईडिझममध्ये चयापचयाची गती मंदावल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. तर हायपरथायरॉईडिझममध्ये चयापचयाची गती वाढल्याने आहार व्यवस्थित असूनही वजन झपाट्याने कमी होते. वजनातील अशा बदलांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते.
थायरॉईड हार्मोन्सची पातळी वाढल्यानंतर हृदयाचे ठोके वेगाने वाढतात. हृदयाची धडधड जाणवणे, अस्वस्थ वाटणे किंवा हात थरथरणे अशी लक्षणेही दिसू लागतात. महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण जास्त दिसून येते. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल होतात. रक्तस्त्राव जास्त किंवा कमी होणे, अनियमित होणे अशी लक्षणे दिसतात. वाढत्या थायरॉईडचा परिणाम गर्भधारणेवरही होऊ शकतो.
थायरॉईड ग्रंथीचा आकार वाढल्यानंतर मानेच्या पुढील भागात सूज किंवा गाठ दिसू लागते. याला गॉइटर म्हणतात. त्यामुळे अन्नपदार्थ गिळताना त्रास होण्याची शक्यता असते. थायरॉईडचा पचनसंस्थेवरही परिणाम होतो. हायपोथायरॉईडिझममध्ये पचनाची गती मंदावल्यामुळे बद्धकोष्ठता होते, तर हायपरथायरॉईडिझममध्ये वारंवार शौचास जावेसे वाटणे किंवा जुलाब लागल्यासारखे वाटू लागते.
ही लक्षणे दिसल्यास स्वतःहून औषधोपचार करू नये. हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नियमित तपासणी आणि योग्य उपचारांमुळे थायरॉईड नियंत्रणात ठेवता येतो.
Leave a Reply