अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात हजारो झाडांची बेकायदा कत्तल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख असलेल्या देसाई यांनी वनाधिकारी आणि लाकूडमाफियांमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप केला आहे.
वृक्षतोडीचा पर्दाफाश झाल्यानंतर प्रशासनावर दबाव वाढला होता. त्यानंतर वनविभागाने संबंधित ठिकाणी धाड टाकून कारवाई केल्याचा देखावा निर्माण केला, असा आरोप होत आहे. मात्र ही कारवाई केवळ कागदोपत्री राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण विभागाची पाठ फिरताच रात्रीच्या अंधारात वखार मालकांनी जप्त केलेला आणि तोडलेला लाकूडसाठा गायब केला. वनविभागाच्या आशीर्वादाशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर लाकूडसाठा गायब होणे अशक्य असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
तृप्ती देसाई यांची मागणी
या संपूर्ण प्रकरणात वनाधिकाऱ्यांचे थेट संगनमत असल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या आणि भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, तसेच कर्तव्यात कसूर करणारे आणि संशयाच्या भोवऱ्यात असलेले उपवनसंरक्षक धर्मवीर साल विठ्ठल यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी थेट मागणी देसाई यांनी केली आहे.
वनमंत्र्यांकडे धाव घेण्याचा इशारा
प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषी वखार मालक आणि वनाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले नाहीत, तर हे प्रकरण शांत बसणार नाही, असा सज्जड इशारा देसाई यांनी दिला आहे. दोषी उपवनसंरक्षकांची तात्काळ हकालपट्टी झाली नाही आणि या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झाली नाही, तर थेट राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन या सर्व घोटाळ्याचा पाढा त्यांच्यासमोर वाचला जाईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. या प्रकरणामुळे अहिल्यानगरच्या वनविभागात मोठी खळबळ उडाली असून, वनमंत्री या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply