बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

बालहक्कांसाठी मुंबईच्या वस्त्यांमध्ये जनजागृती अभियान

बाल अधिकार सप्ताहानिमित्त मुंबईतील कांदिवली, मालवणी, मानखुर्द, वांद्रे, चेंबूर आणि बोरिवली येथे आमची वस्ती, आमची सुरक्षा या संकल्पनेवर जनजागृती अभियान सुरू आहे.

बालहक्कांसाठी मुंबईच्या वस्त्यांमध्ये जनजागृती अभियान

मुलांची सुरक्षा ही प्रत्येक प्रौढ व्यक्तीची तसेच संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. याच विचारातून युवा संस्था आणि बाल अधिकार संघर्ष संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत बाल अधिकार सप्ताहानिमित्त ‘आमची वस्ती, आमची सुरक्षा’ या संकल्पनेवर आधारित जनजागृती अभियानाचे आयोजन कांदिवली, मालवणी, मानखुर्द, वांद्रे, चेंबूर आणि बोरिवली परिसरात करण्यात येत आहे. छायाचित्र प्रदर्शन, बालसभा आणि नागरिकांशी संवादातून मुलांच्या हक्कांबाबत जागर केला जात आहे.

अभियानाचा उद्देश काय?

या अभियानाचा मुख्य उद्देश मुलांसाठी हिंसामुक्त, सुरक्षित आणि बालस्नेही वस्ती निर्माण करणे, तसेच मुलांच्या सुरक्षेमध्ये समुदायाची भूमिका आणि सामूहिक जबाबदारी अधिक मजबूत करणे हा आहे. मुलांच्या सुरक्षेबाबत समुदायामध्ये जनजागृती निर्माण करणे आणि मुलांच्या संरक्षणासाठी समुदायाची भूमिका समजून घेणे, मुलांच्या नजरेतून आपली वस्ती, सुरक्षेशी संबंधित प्रश्न आणि अनुभव छायाचित्रांच्या माध्यमातून जाणून घेणे तसेच हे मुद्दे समुदायासमोर मांडणे, सार्वजनिक ठिकाणी समुदायातील नागरिकांसोबत मुलांच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करणे, तसेच बालसभेच्या माध्यमातून मुलांना आपले विचार मांडण्याची, समस्या व्यक्त करण्याची आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणे, असे चार प्रमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत.

बाल संरक्षण समिती स्थापन करण्यावर भर

अभियानाच्या माध्यमातून मुले, युवक, पालक, स्थानिक समुदाय, शिक्षक, पोलिस प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर दिला जात आहे. युवा संस्थेचे समन्वयक आणि बाल अधिकार कार्यकर्ते प्रकाश भवरे यांनी सांगितले की, मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मुलांच्या संरक्षणाशी संबंधित यंत्रणा, शाळा आणि स्थानिक प्रशासन यांनी एकमेकांशी समन्वय साधून एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. मुलांसाठी हिंसामुक्त आणि सुरक्षित प्रभाग निर्माण करण्यासाठी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली बाल संरक्षण समिती स्थापन करून ती सक्रिय करण्यासाठी समुदायाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. ‘आमची वस्ती, आमची सुरक्षा’ या बाल अधिकार सप्ताहाच्या माध्यमातून प्रत्येक मुलाला सुरक्षित वातावरण मिळावे, त्याचे म्हणणे ऐकले जावे आणि त्याला स्वतःचे विचार मांडण्याची संधी मिळावी, यासाठी सामूहिक प्रयत्न केले जात आहेत. मुलांच्या सुरक्षिततेसाठी केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृती आणि सामुदायिक सहभागातून सुरक्षित व बालस्नेही वस्त्यांची निर्मिती करणे, हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance