माथेरान शहरात पाणी कपात सुरू करण्यास सुरुवात झाली आहे. १६ नोव्हेंबरपासून पाणी कपात लागू होणार असून प्रत्येक विभागात आठवड्यातील तीन दिवस पाणी येणार नाही. फक्त रविवारी कोणत्याही विभागात पाणी कपात नसेल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने जाहीर केले आहे. माथेरान या पर्यटनस्थळी पाणीकपात सुरू झाली तर येथील पर्यटन धोक्यात येणार आहे. दरम्यान, माथेरान शहरात जीवन प्राधिकरणाविरुद्ध प्रचंड संताप निर्माण झाला असून पाण्याचे नियोजन कसे असावे, यासाठी बुधवारी माथेरानकर एकवटणार आहेत.
पाणीपुरवठा बंद असलेले दिवस आणि प्रभावित परिसर
सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी जुना मेरी रोड, ऑलम्पिया मेन आणि पीव्हीसी, पार्क व्ह्यू साईट, कोतवाल नगर, संत रोहिदास नगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर आणि शेलार गल्ली या भागांत पाणीपुरवठा बंद राहील. तर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी मुस्लीम मोहल्ला, वाल्मिकी नगर, पार्क व्हा पॉईंट नवीन, मंकी पॉईंट, दस्तुरी, बाजार पीव्हीसी, इंदिरा नगर आणि ऑलिंपिया एसी या भागांत पाणी येणार नाही.
पाणीपुरवठ्याची व्यवस्था कशी?
माथेरान शहरात येणारे पर्यटक दहा लाखाहून अधिक असून यावर्षी पाणी कमी प्रमाणात पडले आहे. त्यामुळे सर्व शहरांनी पाणी कपात केली असून माथेरान शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शहरात पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. माथेरानमध्ये ब्रिटिशकालीन शालोट लेक असून तेथून पाणी पुरवले जाते. मात्र उल्हास नदीवरून सर्वाधिक पाणी उपसा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करीत असते. उल्हास नदीवरून उचलले जाणारे पाणी कुंभे येथून नेरळ, जुम्मापट्टी आणि वॉटर पाईप पंप हाउसवरून माथेरान शहरात पोहोचते. एवढा लांबचा प्रवास करून आल्याने माथेरानमध्ये पाणी महाग विकले जाते. देशात सर्वात जास्त दराने पाणी जीवन प्राधिकरणकडून विकले जाते, असे सांगितले जाते. मात्र त्याच माथेरानमध्ये आता प्राधिकरणकडून पाणी कपात सूचित केली आहे. उन्हाळी पर्यटन लक्षात घेऊन पाणी नियोजन करण्याचे धोरण निश्चित केले आहे.
हॉटेल व्यवसायावर परिणामाची भीती
माथेरानमधील सर्व प्रकारचे व्यवसाय हे पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे पाणी कपात येथील पर्यटन व्यवसाय संपुष्टात आणणारी ठरू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. पाण्यावर अवलंबून असलेला माथेरान येथील हॉटेल व्यवसाय धोक्यात येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर सर्व ग्रामस्थांनी बुधवारी एकत्र जमून आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी याबाबत भूमिका मांडली आहे. तर व्यावसायिक चंद्रकांत जाधव यांनी शहरातील नागरिक जपूनच पाणी वापरतात, पण पाण्याचे प्रति हजार लिटरचे दर पाहिले तर घाम फुटतो, त्यामुळे जीवन प्राधिकरणाने आधी पाण्याचे नियोजन करावे आणि नंतर पाणी कपात करावी, अशी मागणी केली आहे. पर्यटक पाण्याचा वापर आस्ते करतात. ८०० मीटर उंचीवर टँकरने देखील पाणी नेता येणार नाही. उल्हास नदीवरून उन्हाळी हंगामात १८ ते २० तास पाण्याचा उपसा केला जातो. भविष्याचा विचार करून माथेरानमध्ये पाणी कपात जाहीर केली, असे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.
Leave a Reply