उदगीरमध्ये शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणीचे दहा दिवसांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. पोस्ते पोद्दार शाळेत झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य प्रा. दिलीप मटके यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. उदगीर व देवणी या दोन तालुक्यांतील सुमारे ३०० शिक्षक या प्रशिक्षणात सहभागी होत आहेत.
प्रशिक्षणाचे स्वरूप व आयोजन
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक तसेच अध्यापक विद्यालयांतील अध्यापकाचार्य यांना या प्रशिक्षणात मार्गदर्शन दिले जात आहे. शिक्षकांच्या गरजा, बदलते शैक्षणिक तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती या विषयांवर यात भर दिला जाणार आहे.
सात गट, २८ सुलभक
प्रशिक्षणासाठी सात गट तयार करण्यात आले असून, २८ सुलभक मार्गदर्शन करत आहेत. गटशिक्षणाधिकारी शफी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी शिवराज थोटे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत, तर जी. पी. भोळे व धनाजी जाधव सहायक समन्वयक आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. जे. शेकापुरे होते. डॉ. डी. व्ही. मुंढे यांनी प्रास्ताविक केले, सुधीर साबणे यांनी सूत्रसंचालन केले आणि केंद्रप्रमुख अंजली स्वामी यांनी आभार मानले.
Leave a Reply