भारतीय कार बाजारात रेनोल्ट आपल्या एसयूव्ही पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनी २०२७ मध्ये ब्रिजर आणि बिगस्टर या दोन नव्या एसयूव्ही भारतात सादर करण्याची शक्यता आहे. या दोन्ही गाड्यांचे प्रदर्शन भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो म्हणजेच ऑटो एक्स्पो २०२७ मध्ये होऊ शकते. नवीन डिझाइनसह पेट्रोल, सीएनजी आणि हायब्रीड इंजिनचे पर्याय मिळण्याची अपेक्षा आहे.
ब्रिजर: छोटी एसयूव्ही, मोठी अपेक्षा
रेनोल्ट ब्रिजर ही चार मीटरपेक्षा छोटी एसयूव्ही असेल. या गाडीचे डिझाइन भारतात विकसित करण्यात आले असून, देशांतर्गत आणि जागतिक बाजारासाठी तिचे उत्पादन केले जाणार आहे. या एसयूव्हीमध्ये चौकोनी व्हील आर्च, जास्त ग्राउंड क्लिअरन्स आणि मागच्या दरवाजावर स्पेअर व्हील देण्यात येणार आहे. केबिनमध्ये मागच्या प्रवाशांसाठी २०० मिमी नी रूम आणि ४०० लिटरची बूट स्पेस मिळण्याचा दावा आहे.
फीचर्समध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड आणि पॉवर अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, वायरलेस फोन चार्जिंग आणि एडीएएस सुरक्षा तंत्रज्ञान मिळण्याची शक्यता आहे. इंजिनसाठी १.२-लिटर टर्बो पेट्रोल आणि फॅक्टरी फिटेड सीएनजी असे पर्याय असतील. २०२८ पर्यंत या एसयूव्हीचे स्ट्राँग हायब्रीड आणि इलेक्ट्रिक व्हर्जनही आणण्याची कंपनीची योजना आहे. तिची अंदाजे किंमत ७.५ लाख ते १४ लाख रुपये असू शकते. लाँच २०२७ च्या तिसऱ्या तिमाहीत अपेक्षित आहे.
बिगस्टर: सात आसनांची मोठी एसयूव्ही
दुसरीकडे, बिगस्टर किंवा बोरेल नावाने ओळखली जाणारी नवी सात आसनांची एसयूव्ही भारतात दाखल होऊ शकते. या गाडीची लांबी सुमारे ४.६ मीटर आणि व्हीलबेस २,७०२ मिमी असण्याची शक्यता आहे. तिसऱ्या रांगेतील प्रवाशांसाठी एसी व्हेंट्स आणि चार्जिंग पोर्ट्स दिले जाऊ शकतात. या एसयूव्हीमध्ये ड्युअल स्क्रीन डिजिटल कॉकपिट, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॉवर टेलगेट आणि लेव्हल-२ एडीएएस मिळण्याची अपेक्षा आहे. इंजिनमध्ये १.३-लिटर टर्बो पेट्रोलसह मॅन्युअल आणि ६-स्पीड डीसीटी गिअरबॉक्स मिळू शकतो. यासोबत १.८-लिटर स्ट्राँग हायब्रीड इंजिनचाही पर्याय असेल. अंदाजे किंमत १३ लाख ते २५ लाख रुपये असू शकते.
ब्रिजरची टक्कर किया सोनेट, टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा आणि महिंद्रा व्हिजन एस सोबत होऊ शकते. तर बिगस्टरचा सामना महिंद्रा एक्सयूव्ही ७एक्सओ आणि टाटा सफारीशी होईल. या दोन्ही एसयूव्हीच्या किंमती आणि इंजिनचे तपशील समोर आल्यानंतर भारतीय बाजारातील त्यांची जागा स्पष्ट होईल.
Leave a Reply