इगतपुरी तालुक्यातील धारवाडी व परिसरातील आदिवासी वाड्यांवर मानवधन संस्थेतर्फे यंदाचा दिवाळी सण आदिवासी बांधवांसोबत साजरा करण्यात आला. शाश्वत आनंदाचा साक्षात्कार या संकल्पनेतून सलग अठराव्या वर्षी हा अनोखा सोहळा पार पडला.
अठरा वर्षांची अखंड परंपरा
संस्थेचे संस्थापक ज्ञानरत्न डॉ. प्रकाश कोल्हे आणि सचिव ज्योती कोल्हे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही सामाजिक संस्कारांची परंपरा अखंडपणे सुरू आहे. दिवाळीसाठी जमलेल्या आदिवासी बांधवांसह डॉ. प्रकाश कोल्हे, ज्योती कोल्हे, सरपंच पांडुरंग पुंजारा, लक्ष्मण पादिर आदी उपस्थित होते.
स्वच्छता, रांगोळ्या आणि दीपप्रज्वलन
विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी पाड्यांवरील परिसराची स्वच्छता केली. घरांसमोर सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या, मुलांनी शाळेत तयार केलेले आकाशकंदील लावण्यात आले आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. या विविध उपक्रमांतून संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला होता.
मदतीचा हात
जीवनावश्यक वस्तू, शैक्षणिक साहित्य, दिवाळी फराळ, कोरडा शिधा, लहान मुलांना कपडे, महिलांना साडी, पुरुषांना कपडे आणि अन्नदान अशा स्वरूपात मदतीचा हात देण्यात आला. वैतरणा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अमोल ढेरिंगे, सरपंच पांडुरंग पुंजारा, आदिवासी सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण पादिर, माजी सरपंच निवृत्ती पादिर, सतु पादिर, शांताराम पादिर, लक्ष्मण आहेर यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक वैशाली पवार, सुरेखा आवारे, ज्योती प्रधान, पूनम पाटील आदींनी संयोजन केले.
Leave a Reply