घराची स्वच्छता कितीही चांगली ठेवली, तरी अनेकदा कोपऱ्यांत, छताच्या कडेला किंवा फर्निचरच्या मागे कोळ्यांची जाळी दिसून येतात. ही समस्या अनेक घरांमध्ये अगदी सामान्य आहे. कोळ्यांना शांत, अंधाऱ्या आणि कमी वापरल्या जाणाऱ्या जागा आवडतात, त्यामुळे अशा ठिकाणी ते सहज जाळी तयार करतात. मात्र काही सोप्या सवयी अंगीकारल्या, तर हा त्रास बराच कमी करता येतो.
कोळी कुठे लपतात?
सोफा किंवा बेडच्या मागे, स्टोअर रूममध्ये, कपाटाच्या मागे आणि जुन्या सामानामध्ये कोळी जाळी तयार करू शकतात. त्यामुळे घराची नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे. पंखे, खिडक्यांचे कोपरे, दरवाजांच्या मागील बाजू तसेच फर्निचरच्या आसपास झाडू किंवा व्हॅक्यूम क्लीनरने वेळोवेळी स्वच्छ करावे. घरातील स्टोअर रूम, कपाटांच्या मागील बाजू आणि फर्निचरखालील जागा तपासत राहावे, कारण अशा ठिकाणी कोळी सहज लपून राहू शकतात.
फटी बंद करा
अनेकदा कोळी दरवाजे आणि खिडक्यांमधील छोट्या फटींमधून घरात प्रवेश करतात. खिडक्यांच्या चौकटी, दरवाजांच्या कडा, पाइपच्या आसपास आणि हवा येण्या-जाण्याच्या जागा तपासाव्यात. कुठे फट किंवा मोकळी जागा दिसल्यास ती सील करावी आणि खिडक्यांची जाळी फाटली असल्यास ती दुरुस्त करावी. प्रवेशाचे मार्ग बंद झाले, की घरात कोळी येण्याचे प्रमाण आपोआप कमी होते.
पांढऱ्या व्हिनेगरचा उपाय
घरातील एखाद्या विशिष्ट कोपऱ्यात वारंवार कोळ्यांची जाळी तयार होत असेल, तर पांढऱ्या व्हिनेगरचा वापर करता येतो. पांढरे व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात घेऊन एका स्प्रे बॉटलमध्ये एकत्र करावे. हे मिश्रण खिडक्यांच्या चौकटी, दरवाजांच्या आसपास आणि जाळी दिसणाऱ्या जागांवर हलके फवारावे.
बाहेरची स्वच्छता आणि अनावश्यक सामान
कोळ्यांचा त्रास कमी करण्यासाठी फक्त घराच्या आतील स्वच्छता पुरेशी नाही, तर घराबाहेरही स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. घराच्या भिंतींना लागून वाढलेल्या झुडपांमध्ये, झाडांमध्ये, लाकडांच्या ढिगाऱ्यांमध्ये आणि जुन्या सामानामध्ये कोळी लपून बसू शकतात. त्यामुळे घराच्या बाहेरील भिंतींपासून झाडे थोडी दूर ठेवावीत. बाल्कनीमध्ये अनेकदा जुनी वस्तू, रिकामे बॉक्स आणि इतर सामान बराच काळ पडून राहते. अशा सामानामध्ये कोळ्यांना लपण्यासाठी जागा मिळू शकते, त्यामुळे बाल्कनीतील अनावश्यक वस्तू काढून टाकाव्यात आणि ही जागा नियमितपणे स्वच्छ ठेवावी.
Leave a Reply