भारतात स्कॉच आणि व्हिस्कीच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. ब्रिटनमधून येणारी स्कॉच व्हिस्कीचे ८० हून अधिक कंटेनर भारतीय बंदरात अडकून पडले आहेत. कमी उत्पादन किंवा इतर अडचणींमुळे हे कंटेनर थांबलेले नाहीत. तर भारत आणि ब्रिटनदरम्यान व्यापारी करारांतर्गत आयात शुल्काचा वाद यामागे आहे. या मुद्द्यावर लवकर तोडगा निघाला नाही, तर बाजारात स्कॉच-व्हिस्कीचा पुरवठा खंडित होऊ शकतो. त्याचा परिणाम कंपन्यांसोबतच दुकानांवरही होईल. विशेष म्हणजे स्कॉचचा वापर करून देशात दारू तयार करण्यात येते.
का अडकले स्कॉच-व्हिस्कीचे कंटेनर?
हे प्रकरण दारू तयार करणाऱ्या मोठ्या कंपन्या पर्नोड रिकार्ड आणि डियाजिओ यांच्याशी संबंधित आहे. वृत्तानुसार, दोन्ही कंपन्यांचे ४०-४० हून अधिक कंटेनर भारतीय बंदरात अडकून पडले आहेत. बकार्डीचे पाच कंटेनर अडकले आहेत. या सर्वांना आयात शुल्क भरल्याची माहिती द्यावी लागणार आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यादरम्यान १५ जुलै २०२६ रोजीपासून मुक्त व्यापार करार लागू झाला आहे. त्याअंतर्गत ब्रिटनमधून येणाऱ्या स्कॉच-व्हिस्कीवरील आयात शुल्क १५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. म्हणजे यापूर्वीपेक्षा हे शुल्क अर्ध्यावर आले आहे. पण कस्टम अधिकारी आणि कंपन्यांमध्ये यावरून मतभेद निर्माण झाले आहेत. कोणत्या स्कॉच अथवा व्हिस्कीवर किती आयात शुल्क माफ करायचे, यावरून हा वाद सुरू झाला आहे. यामुळे हे कंटेनर बंदरात थांबवण्यात आले आहेत.
वादाचे नेमके कारण काय?
व्हिस्की आणि स्कॉचची कॅटेगिरी आणि त्यावरील एचएसएन कोडविषयी हा वाद आहे. ब्रिटनकडून भारतात येणाऱ्या स्कॉचचे दोन प्रकार आहेत. एक स्कॉच थेट बंद बॉटलमधील, तर दुसरी भारतात प्रक्रियेसाठी वापरली जाणारी स्कॉच, असे हे दोन प्रकार आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयानुसार, मोठ्या प्रमाणात खुल्या स्वरूपात येणारी स्कॉच ही दारू नाही, तर अल्कोहोलिक बेव्हरेज कन्सट्रेट मानली जावी. भारतात ती जवळपास ६२ ते ६६ टक्के अल्कोहल स्ट्रेंथसह येते. तर तयार स्कॉचमध्ये हेच प्रमाण जवळपास ४२ ते ४६ टक्के इतके असते. पुढे त्यावर प्रक्रिया करून त्याची दारू तयार करण्यात येते आणि विक्री होते.
किंमती वाढणार?
भारतीय बंदरांमध्ये हे कंटेनर थांबले आहेत. सध्या कंपन्या आणि सरकारी विभागातील वादातून पेच निर्माण झाला आहे. मूळ मुद्दा कायम असल्याने हा वाद लवकर सुटणार नसल्याचे मानले जात आहे. यामुळे कृत्रिम तुटवडा तयार होऊन किंमतीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, हा प्रश्न लवकर सुटल्यास कंपन्यांकडे आणि बाजारात स्कॉच आणि व्हिस्कीचा साठा उपलब्ध होईल आणि किंमती नियंत्रित राहतील.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply