सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी चित्रपटाची चर्चा रंगली आहे. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या नावावरून नवा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाच्या शीर्षकात ‘महाराष्ट्र’ या शब्दाचा वापर केल्याने संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. चित्रपटाच्या नावातून ‘महाराष्ट्र’ हा शब्द काढून टाकावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. अन्यथा हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
‘महाराष्ट्र’ शब्दावर आक्षेप का?
महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि परंपरा लाभली आहे, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने मांडली आहे. जेफ्री एपस्टीन हे नाव जगभरात कुप्रसिद्ध आहे. लैंगिक शोषण आणि अल्पवयीन मुलींशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमुळे त्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले होते. त्यामुळे अशा व्यक्तीच्या नावासोबत महाराष्ट्र या पवित्र भूमीचे नाव जोडणे योग्य नाही, असा संघटनेचा आक्षेप आहे.
निर्मात्यांची भूमिका काय?
चित्रपटाच्या निर्मात्यांनी शीर्षकातून ‘महाराष्ट्र’ हा शब्द तातडीने हटवावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित हा विषय असल्याचे सांगत संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. नावात बदल न केल्यास चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग रोखू, असा इशाराही देण्यात आला आहे. या वादामुळे प्रदर्शनापूर्वीच चित्रपट अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता चित्रपटाचे निर्माते या आक्षेपावर काय भूमिका घेतात आणि शीर्षकात बदल करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटात मनोज जोशी मुख्य भूमिकेत असून दीपाली सय्यद, सुबोध भावे, उदय टिकेकर, अक्षय टांकसाळे, माधुरी पवार, भारत गणेशपुरे, अंजली जोगळेकर आणि अनिल नगरकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply