छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाबाहेर मध्यरात्री घडलेल्या गोंधळाच्या घटनेने शहरातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास गोलवाडी परिसरातील बंगल्याजवळ मद्यधुंद तरुणांनी गोंधळ घातला. या घटनेत एका पोलिस कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली असून, तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मध्यरात्री नेमके काय घडले
निवासस्थानाच्या मागील बाजूस काही तरुण मद्यपान करत असल्याचे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितले. त्यावरून तरुणांनी पोलिसांशी वाद घातला. त्यानंतर त्यांनी बाटल्या फोडल्या आणि काही बाटल्या बंगल्याच्या दिशेने भिरकावल्या. सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता झटापट झाली. या झटापटीत एका पोलिस कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली. माहिती मिळताच सातारा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तिघांना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या प्रतिसादावर नाराजी
पालकमंत्री शिरसाट यांनी या घटनेबाबत माध्यमांशी बोलताना पोलिसांच्या प्रतिसादावर प्रश्न उपस्थित केले. तीन युवक रात्री साडेदहा ते पावणेअकराच्या दरम्यान बंगल्यासमोर आले. ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसत होते. त्यांनी बाटल्या फोडल्या. सुरक्षारक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी स्वतःकडे अनेक ओएसडी असल्याचा दावा केल्याचे शिरसाट यांनी सांगितले.
घटनेपेक्षा पोलिस यंत्रणेच्या प्रतिसादाचा मुद्दा अधिक महत्त्वाचा असल्याचे शिरसाट यांनी म्हटले. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिस आयुक्तांचा फोन बंद होता आणि एकही डीसीपी किंवा एससीपी घटनास्थळी आले नाहीत. महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना रात्री बाराच्या सुमारास फोन केला असता, त्यांनी प्रतिसाद देत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे शिरसाट यांनी सांगितले.
माझी अशी परिस्थिती असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला. शहरात गेल्या काही दिवसांत दिवसा ढवळ्या खून होत असल्याच्या आणि अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत, मात्र पोलिस आयुक्तांना याचे गांभीर्य दिसत नसल्याची टीका त्यांनी केली. या प्रकरणी सातारा पोलिसात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply