धुळे शहरापासून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर आंबोडे गाव वसले आहे. या गावाच्या उत्तरेकडील बाजूला आणि नवलनगरच्या दक्षिणेला राज्य मार्गालगत हिरव्यागार शेतशिवाराच्या कुशीत श्री सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर आहे. जुन्या विहिरीशी जोडलेली आख्यायिका, जमिनीच्या पातळीखाली असलेला गाभारा आणि उजव्या सोंडेची गणेशमूर्ती ही या देवस्थानाची ओळख आहे.
## विहिरीशी जोडलेली आख्यायिका
स्थानिकांकडून सांगितल्या जाणाऱ्या कथेनुसार, एका शेतकऱ्याच्या स्वप्नात श्री गणेशाने दर्शन दिले आणि आपण येथील विहिरीत असल्याचा दृष्टांत दिला. विहिरीतून बाहेर काढून त्या ठिकाणी मंदिर उभारावे, असा संदेश मिळाल्याचे सांगितले जाते. या दृष्टांतानंतर गणेशमूर्ती विहिरीतून बाहेर काढण्यात आली आणि तिची स्थापना करून पूजाअर्चा सुरू झाली. कालांतराने या ठिकाणी गणेशभक्तांची वर्दळ वाढत गेली. प्रारंभी पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या या देवस्थानाचा पुढे भक्तांच्या सहकार्याने विकास झाला. आज येथे पक्के मंदिर उभे असून, परिसरात भाविकांच्या सोयीसाठी काही सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
## जमिनीखालील गाभारा आणि उजव्या सोंडेची मूर्ती
मंदिराचे सर्वांत वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्याची रचना. मंदिराचा गाभारा जमिनीच्या पातळीपेक्षा खाली असून, त्याच्या लगतच खोल विहीर आहे. या विहिरीची खोली सुमारे ९५ फूट असल्याचे सांगितले जाते. विहिरीलगतचे मंदिर रस्ता सपाटीकरणापासून साधारण १५ फूट खाली असल्याने तेथे जाण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत. विहीर लागून असल्याने बंदिस्त दरवाजा केला आहे. पावसाळ्यात विहिरीतील पाण्याची पातळी वाढल्यास मंदिराच्या खालच्या भागातही पाणी येते. त्यामुळे पाण्याचा निचरा, विहिरीची सुरक्षितता आणि मंदिराच्या बांधकामाचे संरक्षण यांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक ठरते.
गाभाऱ्यात संगमरवरी मखरात चौथऱ्यावर श्री गणेशाची मूर्ती विराजमान आहे. पश्चिममुखी आणि उजव्या सोंडेची ही गणेशमूर्ती भाविकांचे विशेष आकर्षण ठरते. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती आहेत. मंदिरासमोर सुंदर मूषकाची मूर्ती आहे. परिसरात होमकुंड आणि दक्षिणेकडे शिवपिंडही आहे. या विविध श्रद्धास्थानांमुळे मंदिर परिसराला धार्मिकदृष्ट्या वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक भाविक या गणेशस्थानाला ‘वनदेव स्वयंभू’ असेही संबोधतात.
‘सिद्धिविनायक नवसाला पावतो,’ अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. मनोकामना पूर्ण होण्यासाठी गणरायाला नारळ अर्पण केला जातो. गणेश जयंती, गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. संकष्ट चतुर्थीसह इतर दिवशी देखील भाविकांची गर्दी असते. नवस फेडण्यासाठी येणारे भाविक, कुटुंबासह दर्शनाला येणारे भक्त आणि धुळे शहरासह परिसरातील गावांमधून पायी येणारे गणेशभक्त यांच्यामुळे मंदिरात वर्षभर वर्दळ असते.
तीन पिढ्यांपासून जैन परिवार या देवस्थानाची देखभाल व पूजेअर्चेची जबाबदारी सांभाळत आहे. योगेश जैन आणि त्यांचा परिवार मंदिराच्या धार्मिक परंपरा जपण्याचे कार्य करीत आहेत. स्थानिक ग्रामस्थांचे, पदाधिकाऱ्यांचे व परिसरातील भाविकांचे ग्रामपंचायतच्या सहकार्याने हळूहळू बराच बदल मंदिर परिसरात होत आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या योजनेंतर्गत येथे एक सभागृह, भक्तनिवास उभारण्यात आले. निसर्गसौंदर्य आणि धार्मिक महत्त्व यांची सांगड घालणाऱ्या अशा स्थळांना पर्यटनाच्या नकाशावर स्थान मिळाल्यास ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना मिळू शकते.
मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी धुळे-अमळनेर मार्गावरून नवलनगर येथून आंबोडे गावाकडे जाताना एक किलोमीटरवर मंदिर आहे. नागपूर महामार्गावर अजंग गावाकडून आंबोडे गावाकडे येता येते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply