दिवाळीच्या सुट्टीच्या काळात घरी पाहुणे आणि मित्रमंडळी येत असतात. पाहुण्यांसमोर फराळातील विविध पदार्थ ठेवले जातात. पण रोज रोज गोड पदार्थ खाऊन कंटाळा आल्यावर नेमके काय बनवावे, हे सुचत नाही. अशा वेळी झटपट तयार होणारे पनीर कटलेट हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
पनीरपासून बनवलेले पदार्थ बहुतेकांना खायला खूप आवडतात. पनीर चवीला चांगले लागते आणि शरीरासाठीही गुणकारी मानले जाते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी पनीर कटलेट बनवता येतात. हे कटलेट हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाता येतात. फराळातील तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर पनीरपासून असे नवनवीन पदार्थ करून पाहायला हवेत.
## साहित्य
पनीर कटलेट बनवण्यासाठी पनीर, कोबी, लाल तिखट, हळद, मीठ, आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, बटाटा, ब्रेड आणि तेल लागते. याशिवाय कांदा आणि जिऱ्याची पावडरही या पदार्थात वापरली जाते.
## कृती
सर्वप्रथम बटाटे कुकरमध्ये टाकून शिजवून घ्यावेत. बटाट्याची साल काढून थंड झालेले बटाटे मॅश करावेत. मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, कोबी आणि पनीर घालून व्यवस्थित मिसळावे.
त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि जिऱ्याची पावडर घालून सर्व साहित्य पुन्हा एकदा नीट मिसळावे. मिक्सरच्या भांड्यात ब्रेड टाकून त्याची बारीक पूड करून घ्यावी. तयार मिश्रणाचे कटलेट बनवून ते ब्रेडच्या पुडीत घोळवावेत. त्यानंतर कढईमधील गरम तेलात दोन्ही बाजूंनी लालसर होईपर्यंत तळावेत.
अशा सोप्या पद्धतीने पनीर कटलेट तयार होतात. हा पदार्थ दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागतो. पाहुण्यांच्या स्वागतासाठी किंवा नाश्त्यासाठी हा पदार्थ नक्की करून पाहा.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply