पाकिस्तानचा कसोटी संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान प्रथम फलंदाजी करत असताना कर्णधार बाबर आझम चांगल्या लयीत खेळत होता. त्याने अर्धशतकी खेळी केली, मात्र त्याचे शतकात रूपांतर करण्यात तो अपयशी ठरला. या खेळीनंतर त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
शतकाचा दुष्काळ कायम
पहिल्या डावात बाबर आझमने ५८ चेंडूंमध्ये ५० धावांची महत्त्वाची खेळी केली. मात्र, मोठी खेळी उभारण्याची संधी असतानाही तो शतकापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून शतक न आल्याचा कालावधी आणखी वाढला आहे. गेल्या ४१ डावांमध्ये बाबरच्या बॅटमधून एकही शतक आलेले नाही. या बाबतीत तो पाकिस्तानचा संयुक्तपणे तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्यासोबत आसिफ मुजतबानेही ४१ डाव शतकाविना खेळले आहेत. या यादीत रमीज राजा ७४ डावांसह पहिल्या स्थानावर आहे, तर यासीर हमीद ४७ डावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बाबरच्या फॉर्मबाबत आता चर्चा सुरू झाली असून, पुढील डावांत किंवा पुढील सामन्यांमध्ये तो शतक झळकावून हा विक्रम मोडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मिस्बाहच्या विक्रमाची बरोबरी
शतकाचा दुष्काळ असला तरी बाबर आझमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठला आहे. पाकिस्तानचा कर्णधार म्हणून सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने ७० वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम यापूर्वी माजी कर्णधार मिस्बाह-उल-हक यांच्या नावावर होता. मिस्बाह यांनी आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत एकूण ७० वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावांची खेळी केली होती. श्रीलंकेविरुद्धच्या या खेळीसह बाबरने मिस्बाहच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply