पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील युको बँकेच्या शाखेच्या खातेदारांना गेल्या महिन्याभरापासून बनावट कॉल येत आहेत. ‘तुमचे बँक खाते बंद झाले आहे, ते सुरू करण्यासाठी फॉर्म भरून व्हॉट्सॲपवर पाठवा,’ असे सांगून खातेदारांची फसवणूक केली जात आहे. या प्रकाराने खातेदार हैराण झाले असून, आतापर्यंत २० ते २५ ग्राहकांचे लाखो रुपये गेले आहेत.
कळंब शाखेत लौकी, चांडोली बुद्रुक, नांदूर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, साकोरे, महाळुंगे पडवळ, जाधववाडी यांसह आसपासच्या गावांतील सुमारे ३० ते ३५ हजार खातेदार आहेत. गेल्या एका महिन्यात सुमारे १५० ते २०० खातेदारांना असे बनावट कॉल आले. या फसवणुकीत ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
खाते बंद होण्याची भीती दाखवून गंडा
बनावट कॉल करणारे स्वतःला बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवतात. खाते आजच बंद होईल, अशी भीती दाखवून ते खातेदारांकडून फॉर्म भरून घेतात आणि त्यानंतर खात्यातील पैसे काढले जातात. एका खातेदाराला तर दोनदा अशा कॉलद्वारे फसवणुकीचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. फसवणूक झालेल्या एका खातेदाराने मंचर पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दिली आहे.
बँकेकडून खातेदारांना सूचना
बँकेने स्पष्ट केले आहे की, बँक कोणत्याही खातेदाराला फोन करत नाही. बनावट कॉल आल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधावा आणि पोलिसांकडे तक्रार करावी, अशी सूचना खातेदारांना दिली जात आहे. बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी सांगितले की, फसवणूक लक्षात येताच बँक खाते, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग तातडीने बंद करावे. तक्रारीसाठी युको बँकेच्या १८००१०३०१२३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल किंवा बँकेच्या तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवता येईल. बँक फोन कॉल, एसएमएस किंवा ईमेलद्वारे ओटीपी, पिन, सीव्हीव्ही, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती कधीही मागत नाही, त्यामुळे अशा कोणत्याही कॉल किंवा लिंकवर विश्वास ठेवू नये आणि आपली माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन बँकेने केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply