वाहन चालवताना चालकाला डुलकी लागल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी देवळा तालुक्यातील भऊर येथील आठवीतील विद्यार्थी श्रीवर्धन कैलास पवार याने स्वयंचलित रोबोटिक कारचे मॉडेल विकसित केले आहे. चालकाचे डोळे सलग तीन सेकंद बंद राहिल्यास सावध करणारा इशारा आणि प्रतिसाद न मिळाल्यास वाहन सुरक्षितपणे थांबविण्याची यंत्रणा या मॉडेलमध्ये बसवण्यात आली आहे. श्रीवर्धन कळवण येथील आर. के. एम. विद्यालयात शिकतो.
डोळे बंद राहिल्यास कसे काम करते मॉडेल?
वाहन चालवताना चालकाचे डोळे सलग तीन सेकंद बंद राहिल्यास मॉडेलमधील सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होते. चालकाला सावध करण्यासाठी बझर वाजतो. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास मॉडेल रस्त्याच्या कडेला जाऊन थांबते. त्याचवेळी कुटुंबीय, जवळचे रुग्णालय आणि पोलिस ठाण्याला आपत्कालीन संदेश व वाहनाचे ठिकाण पाठविण्याची सुविधाही यात असल्याचे श्रीवर्धनने सांगितले.
स्वतःच्या बचतीतून साकारलेले मॉडेल
श्रीवर्धनला लहानपणापासून यंत्रांविषयी कुतूहल आहे. वाढत्या रस्ते अपघातांवर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपाय शोधण्याच्या विचारातून त्याने हा प्रयोग केला. स्वतःच्या बचतीतील पैसे आणि सहज उपलब्ध साहित्याचा वापर करून त्याने मॉडेल साकारले आहे. शिक्षणासोबत श्रीवर्धन शेतीकामात वडिलांना मदत करतो. ट्रॅक्टर चालविण्याचा अनुभव आणि शेतीतील यंत्रांविषयी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग त्याला या प्रयोगात झाला. मॉडेल तयार करण्यासाठी मित्र जयेश खैरनार याचीही मदत मिळाली. भविष्यात यात आणखी सुधारणा करून वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त यंत्रणा विकसित करण्याची इच्छा श्रीवर्धनने व्यक्त केली आहे. त्याच्या प्रयोगशील वृत्तीला प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्याचे पालक कैलास पवार यांनी सांगितले, तर विद्यालयाचे मुख्याध्यापक जी. डी. रौंदळ यांनी पुढील प्रयोगांसाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले जाईल, असे म्हटले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply