सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

मान्याचीवाडी गावाला दिवाळी बोनस; ग्रामपंचायतीची चर्चा

सातारा पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने अख्ख्या गावाला दिवाळी बोनस दिला आहे. ४२० लोकसंख्या असलेल्या या गावाच्या उपक्रमाची राज्यभर चर्चा होत आहे.

मान्याचीवाडी गावाला दिवाळी बोनस; ग्रामपंचायतीची चर्चा

दिवाळी म्हटले की प्रत्येक नोकरदाराला वेध लागतात ते बोनसचे. खासगी असो किंवा सरकारी, प्रत्येक कर्मचाऱ्याला दिवाळीचा बोनस ठरलेला असतो. मात्र सातारा जिल्ह्यातील एका गावच्या ग्रामपंचायतीने चक्क अख्ख्या गावालाच दिवाळीचा बोनस वाटला आहे, ज्याची राज्यभरात चर्चा होत आहे.

४२० लोकसंख्येच्या गावाचा अनोखा उपक्रम

सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावाची लोकसंख्या अवघी ४२० असून, तिथे ९८ कुटुंबे आहेत. या ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना दिवाळी बोनस देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा गोडवा आणला आहे. ग्रामपंचायतीने २०२४ मध्ये स्वतःची एक योजना आखली. त्यामाध्यमातून ठराविक रक्कम उभी केली. आता त्या रकमेतून दरवर्षी जादा रक्कम मिळते. त्या रकमेतून घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर कर भरले जातात आणि उर्वरित रक्कम संबंधित खातेदारांना रोख स्वरूपात दिवाळी बोनस म्हणून देण्यात आली आहे.

ग्रामविकासाचे अभ्यासकेंद्र

पाटण तालुक्यातील ही मान्याचीवाडी ग्रामपंचायत ग्रामविकासाचे अभ्यासकेंद्र म्हणून ओळखली जाते. ग्रामपंचायतीने राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे. या छोट्याशा गावाने लोकसहभागातून आणि एकजुटीच्या जोरावर ग्रामविकास काय असतो हे दाखवून दिले आहे. गावच्या लोकप्रतिनिधींची दूरदृष्टी आणि सर्वांच्या सहभागामुळे हे छोटेसे गाव राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहे. २०२४ मध्ये देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोत्तम पंचायतचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. या राष्ट्रीय पुरस्कारासोबत गावाला तब्बल दीड कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाले. सोबतच अपारंपरिक आणि हरित ऊर्जेचा प्रभावी वापर केल्याबद्दलही मान्याचीवाडी गावाला एक कोटी रुपये रकमेचा ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. आता या आदर्श ग्रामपंचायतीने थेट अख्ख्या गावाला दिवाळी बोनस वाटल्याने पुन्हा एकदा त्याची जोरदार चर्चा होत आहे.

स्रोत: मूळ बातमी

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance