राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील २७० बालकांची जिल्हा रुग्णालयात मोफत तपासणी करण्यात आली. यापैकी ९ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून २६० बालकांना लवकरच श्रवणयंत्रे दिली जाणार आहेत.
श्रवणयंत्रासाठी पूर्वतपासणी शिबिर
जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील बालकांची अंगणवाडी व शाळांमध्ये नियमित आरोग्य तपासणी केली जाते. या मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून कर्णबधिर असलेल्या, तसेच श्रवणयंत्राची आवश्यकता असणाऱ्या बालकांसाठी पूर्वतपासणी शिबिर घेण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय आणि कर्ण हॉस्पिटल यांच्यातर्फे नुकतेच हे शिबिर झाले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार शिंपी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलेश पाटील, नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. योगेश्वरी मराठे, डॉ. परदेशी, डॉ. संदेश बागडी आणि जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक दीपक चौधरी यांनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील गरजू बालकांना वेळेवर तपासणी, उपचार आणि आवश्यक उपकरणे मिळण्यास मदत होणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply